मध्यवर्ती वाहतूक व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन

गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडल्यास कमीत कमी वेळेत पोलीस, अग्निशमन केंद्र, वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचण्यासाठी नवीन यंत्रणा उभी करण्याचे काम सुरु आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दुर्घटनास्थळी मदत उपलब्ध करुन दिली जाईल, असे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी शनिवारी सांगितले.

पुणे पोलीस आयुक्तालयात सुरु करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन माथूर यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी ते बोलत होते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे,  रोटरीचे प्रांतपाल अभय गाडगीळ, फोक्सव्ॉगन कंपनीचे पदाधिकारी टॉस्टर्न स्टार्क, गंगाधर जोशी उपस्थित होते. वाहतूक व्यवस्थापन केंद्राच्या उभारणीसाठी रोटरी क्लब आणि फोक्सवॅगन कंपनीकडून सहकार्य करण्यात आले आहे.

माथूर म्हणाले, की मुंबई पोलिस दलात वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कक्ष उभारण्यात आला आहे. शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येणे शक्य होईल. पुण्यात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर वाहतुकीला शिस्त लागेल. नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो. दंड वसूल केल्यानंतर वाहनचालक नियमांचे पालन करण्यास सुरुवात करतात. स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन केल्यास दंड भरण्याची वेळ येणार नाही.

केंद्र सरकारकडून गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडल्यास तातडीने मदत देण्यासाठी एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. चार राज्यांमध्ये हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्रात हा उपक्रम लवकरच सुरु केला जाईल. गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळते. त्यानंतर पोलिसांकडून तातडीने समन्वय साधून अग्निशमन, वैद्यकीय मदत तसेच पोलीस घटनास्थळी दाखल होतील, असे या यंत्रणेचे स्वरुप आहे, असे माथूर यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त शुक्ला, गाडगीळ, स्टार्क यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस उपायुक्त मोराळे यांनी प्रास्ताविक केले. जोशी यांनी सूत्रसंचालन केले.