राज्यासह संपूर्ण देशात आतापर्यंत अपुरा पाऊस पडलेला असतानाच तो पुन्हा चांगल्याप्रकारे सक्रिय होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडावा लागणार आहे. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल, मात्र त्याची व्याप्ती फारशी नसेल, असे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी स्थिती बदलण्याची लगेच तरी शक्यता नाही.
या वेळी मोसमी पावसामध्ये मोठय़ा प्रमाणात चढउतार पाहायला मिळाले. तो तब्बल दीड महिने उशिराने सक्रिय झाला. त्यानंतर महिनाभर चांगला पाऊस पडला. आता आठ-दहा दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. काही ठिकाणी पडणारा वादळी पाऊस वगळता सर्वदूर पाऊस गायब झाला आहे. देशात सध्या सरासरीच्या १८ टक्के कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात त्याहून बिकट स्थिती आहे. राज्याच्या चारही उपविभागांमध्ये अपुरा पाऊस आहे. कोकणात तो सरासरीच्या १३ टक्के कमी, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या १८ टक्के कमी पडला आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात त्यापेक्षा वाईट स्थिती आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीच्या ३० टक्के कमी, तर मराठवाडय़ात ते तब्बल ६२ टक्क्य़ांनी कमी आहे.
या पाश्र्वभूमीवर येत्या आठ-दहा दिवसांत तरी पावसाचे मोठय़ा प्रमाणावर पुनरागमन होण्याची शक्यता नाही. याबाबत पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या तोंडावर काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, त्याचे प्रमाणही किरकोळच असेल. तोपर्यंत तर काही ठिकाणी उन्हाळी पावसाप्रमाणे वादळी पाऊस अपेक्षित आहे. त्याचा विस्तार अगदीच कमी असेल. त्यामुळे पावसाच्या पुनरागमनासाठी सप्टेंबर महिनाच उजाडावा लागेल. सध्या तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मात्र, नेमकी काय परिस्थिती असेल हे पाहण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
महाराष्ट्रात आतापर्यंत पडलेला पाऊस:
कोकण                 ८७ टक्के (१३ टक्के कमी)
मध्य महाराष्ट्र       ८२ टक्के (१८ टक्के कमी)
मराठवाडा            ३८ टक्के (६२ टक्के कमी)
विदर्भ                  ७० टक्के (३० टक्के कमी)