सामाजिक रक्षाबंधन महाअभियानाची सांगता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरातर्फे राबविण्यात आलेल्या ‘सामाजिक रक्षाबंधन ई संदेश पर्यावरणाचा’ या महाअभियानात ४४ केंद्र आणि १७३ हून अधिक उपक्रेंद्रावर रविवारी अवघ्या चार तासांतच ४५ टनांहून अधिक प्लास्टिक आणि ई-कचरा संकलित करण्यात आला. हा कचरा शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्था-संघटनांतर्फे १८ ऑगस्टपासून राबवण्यात आलेल्या या महाअभियानाची रविवारी सांगता झाली. त्यानिमित्त सकाळी नऊ ते एक अशा अवघ्या चार तासांमध्ये शहरातील सर्व ४४ केंद्र आणि १७३ उपकेंद्रांवर सकाळपासून नागरिकांनी गर्दी करीत त्यांच्या घरातील प्लास्टिक आणि ई-कचरा आणून जमा केला. बाटल्या, डबे, विविध खेळणी, बॅगा या स्वरूपातील प्लास्टिक कचरा तर जुने बिघडलेले मोबाइल, चार्जर, वायर्स, कॉड्स, फॅन, कुलर, स्कॅनर, डीव्हीडी, व्हीसीडी प्लेअर, सीडी, फ्रीज, टीव्ही, सीपीयू, की बोर्ड, संगणक मॉनिटर, टेपरेकॉर्डर, इस्त्री, हेअर ड्रायर, इनव्हर्टर, मायक्रोव्हेव, पिंट्रर असा ई-कचरा मोठय़ा प्रमाणात आणून जमा केला. कचरा जमा करण्यासाठी आलेल्या नागरिकांना संघातर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली शहरातील लोकप्रतिनिधी, ७० हून अधिक संस्था, संघटना, बँका या महाअभियानात सहभागी झाल्या होत्या. दहा दिवसांच्या अभियानातून सुमारे पंधरा हजारांहून अधिक संघ कार्यकत्रे, दीड लाखांहून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी होते.
सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आणि आमदार मेधा कुलकर्णी यांनी कोथरूड भागातील संकलन केंद्राला भेट दिली. या उपक्रमाचे कौतुक करीत स्वच्छ आणि सुंदर पुणे महानगरासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत कांबळे यांनी व्यक्त केले.
संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, समाजापुढचे विविध प्रश्न, समाजानेच पुढे येऊन सोडवावे लागणार आहेत. प्रत्येक बाबतीत शासनव्यवस्थेवर कितपत अवलंबून राहावे याचा पुनर्वचिार करावा लागेल. समाजामध्ये असलेली प्रचंड शक्ती समाजासाठी उपयोगात यावी यासाठी संघ अविरत प्रयत्न करीत असतो.
या महाअभियानाच्या निमित्ताने संघातर्फे शहराच्या विविध भागात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्र प्रदर्शन अशा उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी व महर्षी स्त्री शिक्षण संस्थेतर्फे परिसंवाद, शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळांतर्फे प्रचार फेरी तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयाच्या वतीने शहराच्या विविध भागात पथनाटय़े सादर करण्यात आली.