शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पंचवीस टक्के राखीव जागांवर पहिल्या फेरीत नऊ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळा मिळू शकलेली नाही. साधारण १६ हजार जागांसाठी ८ हजार विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आल्या असून प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सत्तर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्य़ातील एकूण ७८१ शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव असलेल्या पंचवीस टक्के जागांसाठी शनिवारी सोडत झाली. या वेळी ८ हजार २३१ विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आल्या. यातील साधारण ६ हजार ९०० विद्यार्थी पहिलीचे आहेत. पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवडमधील एकूण १६ हजार ८९४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होत आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ९ हजार ८२१ विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या फेरीत समावेश होणार आहे.
शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची प्रक्रिया सोमवारपासून (२ मे) सुरू झाली असून प्रवेश घेण्यासाठी १४ मेपर्यंत मुदत आहे. प्रवेश फेरीच्या पहिल्या दिवशी सत्तर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली आणि पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी काही अडचणी आणि तक्रारी असतील, तर पुणे महापालिकेची तक्रार निवारण केंद्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेची केंद्र, हवेलीमध्ये आणि जिल्हास्तरावर अशी तक्रार निवारण केंद्र स्थापन केली आहेत. त्याद्वारे प्रवेशादरम्यान पालकांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.

मराठी माध्यमाच्या शाळेत १० टक्केच प्रवेश
पालकांनी दिलेले पर्याय, घरापासूनचे अंतर यांची सांगड घालून काढण्यात आलेल्या सोडतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आल्या आहेत. मात्र पहिल्या फेरीत प्रवेश मिळणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी साधारण दहा टक्केच विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत. साधारण ९३० विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या शाळा मिळाल्या असून बाकी सर्व प्रवेश हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आहेत.

शहरी भागांत गर्दी, ग्रामीण भागांतील शाळा ओस
आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी शहरी भागामध्ये अधिक चुरस आहे. मात्र त्याच वेळी जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांतील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी मिळणार का याबाबतही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे, अशी माहिती शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे शहरांत काय?

* महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या शाळांमधील प्रवेश क्षमता – ४ हजार ९४३
* आलेले अर्ज – ७ हजार ६८८
* पहिल्या फेरीत शाळा मिळालेले विद्यार्थी – ४ हजार ७८९

पालकांना एसएमएस नाहीत
प्रवेश प्रक्रियेबाबत साधारण ११ हजार ८४८ एसएमएस पाठवण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात अद्यापही प्रवेश प्रक्रियेबाबत काहीच एसएमएस आला नसल्याची पालकांची तक्रार आहे. ‘पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच एसएमएस पाठवण्यात आले आहेत,’ असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.