चिकुनगुनियाचे रुग्ण पुण्यात सर्वाधिक

राज्याच्या आरोग्य विभागाने डास नियंत्रणाबद्दल वारंवार सूचना दिल्यानंतर अखेर पुणे महापालिकेने ‘डास नियंत्रण समिती’ (मॉस्किटो अ‍ॅबेटमेंट कमिटी) स्थापन केली आहे. या वर्षी पुण्यात जानेवारीपासून चिकुनगुनियाचे १३८ रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार एप्रिलपर्यंत आढळलेले चिकुनगुनियाचे राज्यातील ७१ टक्के रुग्ण पुण्यातले आहेत.

चिकुनगुनिया व डेंग्यूचा पुण्यातील प्रादुर्भाव पाहता पालिकेने लवकर डास नियंत्रण समिती स्थापन करुन उपाययोजना सुरू करायला हव्यात. डास नियंत्रणाबाबत पुण्याचे प्रतिबंधक उपाय कमी पडतात, असे मत राज्याच्या आरोग्य विभागातर्फे व्यक्त केले जात होते. मुंबई आणि नवी मुंबईप्रमाणे पुण्यालाही समिती स्थापन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ात ही समिती स्थापन होऊन तिची पहिली बैठक अतिरिक्त आयुक्त डॉ. राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या समितीत रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, बँका, बीएसएनएल, म्हाडा यांसारख्या विविध कार्यालयांमधील प्रतिनिधींना सामावून घेऊन मोठी आवारे असणाऱ्या कार्यालयांनी स्वत:च जबाबदारी घेऊन डासांची पैदास टाळावी, असा त्याचा प्रमुख उद्देश आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर डास नियंत्रणासाठीच्या नियोजनाबाबत पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत म्हणाल्या,‘‘खासगी डॉक्टर, प्रयोगशाळा व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बैठका घेण्यात येणार आहेत. चिकुनगुनियाचे रुग्ण या वर्षी अधिक आहेत, परंतु डेंग्यू व चिकुनगुनियाचा डास एकच असल्यामुळे डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. तापाच्या रुग्णांच्या लक्षणांवरुन डॉक्टरांनी वेळीच पालिकेस कळवणे गरजेचे.’’
chart1