शिक्षण विभागाच्या कल चाचणीचे निष्कर्ष

एकीकडे शाळांमध्ये कला आणि क्रीडा विषय अभ्यासक्रमातून जवळपास हद्दपार करण्यात येत असताना विद्यार्थ्यांचा कल मात्र ललित कला किंवा प्रयोगजीवी कलांच्या शिक्षणाकडे असल्याचे दिसते आहे. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल हा कला शिक्षणाकडे असल्याचे शासनाने घेतलेल्या कल चाचणीतून निष्पन्न झाले आहे.

राज्यातील शाळांमधील कला आणि क्रीडा शिक्षकांची पदे रद्द करून स्थानिक शिक्षक किंवा कलाकारांकडून हे विषय शिकवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शाळेतील कला, कार्यानुभव आणि क्रीडा या विषयांच्या तासिकाही कमी करण्यात आल्या आहेत. हे चित्र एकीकडे दिसत असताना दुसरीकडे यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २ लाख ४५ हजार ३३५ विद्यार्थ्यांचा कल हा कलांचा अभ्यास करण्याकडे असल्याचे कल चाचणीच्या अहवालावरून दिसत आहे.

शिक्षण विभाग आणि श्यामची आई फाऊंडेशनकडून गेल्या वर्षीपासून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘कल चाचणी’ घेण्यात येते. यावर्षी राज्यातील १६ लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. कला, आरोग्य, कृषी अभ्यासक्रम, संरक्षण किंवा तत्सम क्षेत्र, वाणिज्य, भाषा, सामाजिक शास्त्रे आणि मानवविज्ञान शाखा आणि तंत्रज्ञान शाखा अशा सात क्षेत्रांनुसार विद्यार्थ्यांचा कल तपासण्यात आला. चाचणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ६७ हजार ४०३ विद्यार्थ्यांचा कल निश्चितपणे एकाच क्षेत्राकडे असल्याचे दिसत आहे. त्यानुसार कला शिक्षणाखालोखाल आरोग्य क्षेत्रातील अभ्यासाला विद्यार्थ्यांचे प्राधान्य असल्याचे दिसते. २ लाख १७ हजार ३६५ विद्यार्थ्यांचा कल आरोग्य क्षेत्रात आहे. गेल्या दशकात प्रवेशासाठी सर्वाधिक गर्दी होणाऱ्या अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचे दिसत असून १ लाख ६ हजार २०७ विद्यार्थ्यांचा कल या क्षेत्राकडे असल्याचे दिसत आहे.

student-chart

एकूण विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८० हजार ८२० विद्यार्थ्यांना दोन क्षेत्रांमध्ये रस असल्याचे दिसते आहे, तर १६ हजार ९४ विद्यार्थ्यांचा निवडलेल्या सातही क्षेत्राकडे समान कल असल्याचे समोर आले आहे. कल चाचणीचे निष्कर्ष विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या निकालाबरोबर देण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी विद्यार्थी संकेतस्थळावर कल चाचणीचे निष्कर्ष पाहू शकतील. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांबाबतची माहिती, त्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रत्येक क्षेत्राशी संबंधित राज्यातील महाविद्यालयांची माहितीही मिळणार आहे.