बावधन बुद्रुक येथील रायन इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर डोंगर फोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोणतीही परवानगी न घेता हे केले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत तक्रार करूनही यंत्रणांकडून दखल घेण्यात आलेली नाही.
बावधन परिसरात अनेक टेकडय़ा व डोंगर आहेत. ते फोडले जात असल्याच्या तक्रारी अधूनमधून होत असतात. बावधन बुद्रुक येथील रायन इंटरनॅशनल शाळेजवळील डोंगर बुधवारपासून फोडण्याचे काम सुरू झाले आहे. या डोंगराला लागूनच अनेक रहिवासी इमारती तसेच, वस्ती आहे. तरीसुद्धा हे काम सुरू आहे. त्याबाबत परवानगी घेण्यात आलेली नाही असी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्याच परिसरात आदित्य निसर्ग या सोसायटीला लागून असलेल्या डोंगरावर गेल्या १५ दिवसांपासून असेच काम सुरू होते. मध्ये काही दिवस ते बंद करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा तेथेही डोंगर फोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या कामाबाबत काही नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. मात्र, हे काम आपल्या हद्दीत नसल्याचे सांगण्यात आले, अशी या नागरिकांनी माहिती दिली.