विज्ञानाची प्रगती आणि तंत्रज्ञानाचा विकास याचा परिणाम जसा समाजावर झाला तसाच तो चित्रपटांवरही झाला. सेल्यूलॉईड माध्यमाची जागा डिजिटल तंत्राने घेतली. मात्र, चित्रपट हा बुद्धीला नाही तर थेट हृदयाला हात घालतो. त्यामुळेच हृदयाशी संवाद साधणारे चित्रपट हे माध्यम अमर आहे, अशी भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी व्यक्त केली.
व्ही. शांताराम फाउंडेशन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा’ या सूचीचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सचिन यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी माशेलकर बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, व्ही. शांताराम यांची कन्या मधुरा जसराज, फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ‘आशय’चे सचिव वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते. ‘शांतारामा’ या व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रावर आधारित सीडी संचाचे आणि ‘अमर मराठी चित्रगीतमाला’ या शांतारामबापूंच्या मराठी चित्रपटांच्या गीतांचा समावेश असलेल्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. तर, ‘शकुंतला’ या चित्रपटाची मूळ प्रत (निगेटिव्ह) किरण शांताराम यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केली.
गिरगावात बालपण गेले असल्यामुळे सेंट्रल, मॅजेस्टिक, रॉक्सी, मिनव्र्हा येथे चित्रपट पाहिले आहेत. ‘श्यामची आई’, ‘लाखाची गोष्ट’, ‘जगाच्या पाठीवर’ हे चित्रपट अजूनही लक्षात आहेत. ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाचे तिकीट पाच आणे होते; या आठवणींना माशेलकर यांनी उजाळा दिला. शांतारामबापूंनी केवळ नवीन तंत्राचा वापर केला नाही, तर चित्रपटांना नवी दिशा दिली. चित्रपटाला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला असला तरी त्याचा पाया शांतारामबापूंनी घातला, असा गौरव त्यांनी केला.
‘मराठी चित्रसंपदा’ हा ग्रंथ कोणत्याही धार्मिक ग्रंथाएवढाच मौल्यवान असल्याची भावना सचिन यांनी व्यक्त केली. आपल्या सर्व चित्रपटांच्या मूळ प्रती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील ‘कुणी तरी येणार येणार गं’ या गीताच्या चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा देतानाच त्यांनी शांतारामबापूंशी असलेला स्नेह उलगडला.
दिलीप प्रभावळकर यांनी ‘शांतारामा’तील काही उताऱ्यांचे अभिवाचन केले. ‘हे वाचताना मी बोलतोय’ असे खुद्द शांतारामबापू यांनीच म्हटले आहे. त्याची प्रचिती मला आली. चित्रपटसृष्टीतील गुणी माणसांना एकत्र करून शांतारामबापूंनी त्यांच्या प्रतिभेचा उपयोग करून घेतला, असेही त्यांनी सांगितले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.

चित्रपट कसा पोहोचवणार ?
पूर्वी संगणक म्हणजे डेस्क टॉप होते. त्यानंतर मांडीवर ठेवता येईल असा लॅपटॉप आला. आता खिशात ठेवू शकतो अशा मोबाईलमुळे कोणीही, कधीही आणि कोठेही चित्रपट पाहू शकतो. सध्याच्या युवकांना इन्स्टंट कॉफीप्रमाणे इन्स्टंट यश हवे आहे. एका संशोधनाच्या आधारे युवा पिढीचा कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा (अटेंशन स्पॅन) कालावधी हा २० सेकंद झाला आहे. अशा प्रेक्षकांपर्यंत चित्रपट नेणे हे सध्याच्या चित्रकर्मीपुढचे आव्हान आहे, याकडेही माशेलकर यांनी लक्ष वेधले.