प्रशासकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अधिकाऱ्यांशी विद्यार्थ्यांना संवाद साधता येणार आहे. स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन शनिवारी (१३ फेब्रुवारी) आणि रविवारी (१४ फेब्रुवारी) होणार आहे. परिसंवाद, अधिकाऱ्यांचे अनुभवकथन, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कट्टा असे कार्यक्रम या संमेलनात आयोजित करण्यात आले आहेत.
ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. हे संमेलनाचे सातवे वर्ष असून यावर्षीचे संमेलन पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, तर संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या संमेलनाचे उद्घाटक आहेत. शनिवारी सकाळी साडेसात वाजता ग्रंथदिंडीने या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिरापर्यंत ग्रंथदिंडी निघणार आहे. याच दिवशी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दोन दिवसीय संमेलनाचा समारोप रविवारी होणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रशासकीय काम, सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद या संमेलनात होणार आहेत. त्याचप्रमाणे सनदी अधिकाऱ्यांचे अनुभवकथन, अधिकाऱ्यांचे कविसंमेलन, अधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कट्टा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. अग्रवाल, परिवहन आयुक्त शाम वर्धने, चंदिगडमधील जिल्हाधिकारी अजित जोशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, डॉ. अनिल अवचट, शेखर गायकवाड, रंगनाथ नाईकनवडे, कृष्णात पाटील, डॉ. सागर डोईफोडे, प्राजक्ता लवंगारे, कालीचरण खरताडे, श्यामसुंदर पाटील, अजय वैद्य आदींचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती स्टडी सर्कलचे संस्थापक डॉ. आनंद पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. विनोद शिरसाठ या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी असलेल्या साहित्याचे प्रदर्शनही या संमेलनात होणार असून पुस्तकांवर सवलतही मिळणार आहे.