मेळघाट परिसरातील आदिवासी समाजामध्ये महिलांवर अत्याचार होत नाहीत, तर मुलींचा जन्म हा साजरा करण्यात येतो. आदिवासी समाज हा वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ झाला असून त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टीही सकारात्मक असल्याचे मत, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी व्यक्त केले.
एक्सलन्स ग्रुपच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्यास जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेश भरडे, संचालिका डॉ. मनीषा भरडे, उपाध्यक्षा रेश्मा हातिजे या वेळी उपस्थित होते. विविध स्वयंसेवी संस्था आणि नवउद्योजकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
आई-वडिलांचा संस्कार, ग्रंथांचे वाचन आणि महात्मा गांधी यांची विचारसरणी याचा जीवनावर प्रभाव पडला. सामाजिक कार्यामध्ये झोकून देता आले आणि यामध्ये पत्नीची साथ मिळाल्याने मेळघाट परिसरात काम करता आले, असे सांगत डॉ. कोल्हे यांनी  या कामामध्ये शहरातील सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
खेडय़ाकडे चला हा महात्मा गांधींचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारे कोल्हे दाम्पत्याचे कार्य हे युवा पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांनी मेळघाट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून जे काम हाती घेतले आहे ते अधिकाधिक युवकांनी अनुभवावे यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले.