अकोला ते औरंगाबाद दरम्यान असलेल्या वीजवाहिनीच्या क्षमतावाढीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहिनीवरील सुमारे एक हजार मेगावॉट विजेच्या पुरवठय़ावर परिणाम होणार असल्याने २५ ते २७ एप्रिल या कालावधीत पुण्यासह नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जालना, कोल्हापूर, अहमदनगर, बारामती, सोलापूर या विभागांमध्ये वीजकपात होण्याची शक्यता आहे, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या पॉवर ग्रीड व राज्यातील महापारेषण कंपनीच्या वतीने वाहिनीच्या क्षमतावाढीचे काम केले जाणार आहे. २५ एप्रिलला दुपारी चार वाजल्यापासून २७ एप्रिलला संध्याकाळी सहापर्यंत हे काम करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित होता. मात्र, भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या कामामुळे वीजग्राहकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणांचा वापर व जास्त मनुष्यबळाचा वापर करून दोन दिवसांतच हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यामध्ये विजेची निर्मिती राज्याच्या पूर्व भागात होत असून, विजेची मागणी राज्याच्या मध्य व पश्चिम भागात मोठय़ा प्रमाणावर आहे. अकोला ते औरंगाबाद या वाहिनीवरून सध्या एक हजार मेगावॉट विजेचे वहन केले जाते. क्षमतावाढीच्या कामानंतर या वाहिनीची वीज वाहून नेण्याची क्षमता दोन हजार मेगावॉटपर्यंत वाढणार आहे. विजेची वहन क्षमता व उपलब्धता वाढविण्याच्या या कामासाठी कराव्या लागणाऱ्या वीजकपातीबाबत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.