सह्यद्री गिरिभ्रमण संस्थेची मागणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या शिवशाही बस सेवेचा शुभारंभ शिवनेरीपासून करावा आणि शिवनेरी-सिंधुदुर्ग अशी पहिली बससेवा असावी, अशी मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने केली आहे. या संदर्भात संस्थेने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदन पाठविले आहे. या मागणीला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पािठबा दिला असून त्यांनाही तसे पत्र मंत्री रावते यांना दिले आहे.

राज्यातील किल्ले पर्यटनाला चालना देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास महाराष्ट्राला समजावा, यासाठी एसटीच्या बससेवेद्वारे राज्यातील सर्व किल्ले जोडावेत, अशी मागणी

संस्थेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी ते समाधिस्थळ किल्ले रायगड अशी बससेवा ६ एप्रिल २००७ रोजी सुरू करण्यात आली होती.

महामंडळातर्फे ‘शिवशाही’ ही विशेष बस सेवा सुरू करण्यात येत असून त्यासाठी नव्याने ५०० बस सेवेत दाखल होणार आहेत. या सेवेचा शुभारंभ शिवनेरी किल्ल्यावरूनच करण्यात यावा, आणि पहिली बस ‘शिवनेरी – सिंधुदुर्ग‘ सुरू करावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. ही बस विशेष मार्गावरील विविध किल्ल्यांना भेट देऊन सिंधुदुर्गला पोहोचेल. शुभारंभाच्या पहिल्या बसचे संपूर्ण आगाऊ आरक्षण करण्याची तयारीही संस्थेने दाखविली आहे.