महापालिकेचे आगामी वर्षांचे अंदाजपत्रक तयार करताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला घसघशीत रकमेच्या तरतुदी मिळाल्या असून इतर पक्षांना मात्र किरकोळ तरतुदी मिळाल्यामुळे सर्वपक्षीय सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ढोबळ आकडेवारीनुसार राष्ट्रवादीने सुमारे आठशे कोटींच्या तरतुदी मिळवल्याचे सांगितले जात आहे. त्या तुलनेत सत्तेमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या सहकारी काँग्रेसला मात्र फारच किरकोळ निधी देण्यात आला आहे.
आयुक्तांनी त्यांच्या अंदाजपत्रकात जी विकासकामे सुचवली होती, त्यातील विकासकामांना स्थायी समितीने ३० टक्क्यांपर्यंत कात्री लावली आहे आणि उत्पन्नाच्या बाबींमध्ये वाढ दाखवून अंदाजपत्रक ५४९ कोटींनी वाढवले आहे. प्रत्यक्षात आयुक्तांच्या अंदाजपत्रकापेक्षा स्थायी समितीचे अंदाजपत्रक ५४९ कोटींनी वाढल्याचे दिसत असले, तरी विकासकामे कमी करण्यात आल्यामुळे आणि अंदाजपत्रक वाढवल्यामुळे एकूण सुमारे बाराशे कोटी रुपये स्थायी समितीला अंदाजपत्रक तयार करताना उपलब्ध झाल्याचे आता सांगितले जात आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असली, तरी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांसाठी प्रत्येकी पाच कोटींच्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. काँग्रेसला मात्र त्या तुलनेत कमी तरतुदी करण्यात आल्याची तक्रार सोमवारी काँग्रेसचे नगरसेवक करत होते. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना तीन कोटी तर शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रत्येकी अडीच कोटी अशा तरतुदी करण्यात आल्याचे ढोबळमानाने दिसत आहे.