एके काळी मराठी चित्रपटांना बहुपडदा चित्रपटगृह म्हणजेच मल्टिप्लेक्समध्ये जागा मिळणे मुश्कील होते. मात्र, आता ‘कटय़ार का़ळजात घुसली’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद ध्यानात घेता मराठी चित्रपटांना ‘बिग स्क्रीन’ म्हणजेच सर्वाधिक आसनक्षमता असलेल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शन करण्याची वेळ मल्टिप्लेक्सचालकांवर आली आहे. या चित्रपटांपुढे ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपटही फिका पडल्याचे चित्र आहे.
‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित चित्रपट आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाचा ‘सिक्वल’ म्हणजेच दुसरा भाग दिवाळीला प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांना मिळणाऱ्या रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मराठी चित्रपटांची अक्षरश: दिवाळी झाली आहे. या चित्रपटांनी सलमान खानची दुहेरी भूमिका असलेल्या ‘राम रतन धन पायो’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. या दोन चित्रपटांना लाभलेला उदंड प्रेक्षकवर्ग ध्यानात घेऊन मल्टिप्लेक्समध्ये सर्वाधिक आसनक्षमता असलेल्या चित्रपटगृहामध्ये या दोन्ही चित्रपटांचे खेळ होत आहेत.
सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड, सिंहगड रस्त्यावरील अभिरूची सिटी प्राईड, कोथरूड येथील सिटी प्राईड आर-डेक्कन आणि शिवाजीनगर येथील मंगला या मल्टिप्लेक्समध्ये ‘कटय़ार’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये अधिक आसनक्षमता असलेल्या चित्रपटगृहांमध्ये हे मराठी चित्रपट प्रदर्शित करावे लागले आहेत. या ‘बिग स्क्रिन’मध्ये सुरूवातीला ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, या दोन मराठी चित्रपटांनी आता मल्टिप्लेक्समधील मोठी आसनक्षमता असलेली चित्रपटगृहे ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती ‘सिटी प्राईड’चे भागीदार पुष्कराज चाफळकर यांनी दिली. पहिले तीन दिवस हे तीनही चित्रपट हाऊसफुल्ल होते. दिवाळीच्या सुटय़ा संपल्यामुळे मंगळवारपासून (१७ नोव्हेंबर) ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाला प्रतिसाद काहीसा फिका झाला असला तरी या दोन्ही मराठी चित्रपटांची जादू अजूनही कायम आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठीची घोडदौड
पूर्वी मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्थान मिळायचे नाही. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने यासंदर्भात आवाज उठविल्यानंतर राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना वेळ दिला पाहिजे, असा कायदा केला. मात्र, सर्वात कमी आसनक्षमता असलेल्या चित्रपटगृहात आणि सहसा प्रेक्षकांना जमू शकणार नाही अशी वेळ मराठी चित्रपटांसाठी राखून ठेवली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत आशय-विषयाच्या वेगळ्या सादरीकरणामुळे मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कटय़ार आणि मुंबई-पुणे मुंबई या चित्रपटांनी ‘बिग स्क्रीन’मध्ये स्थान पटकावून हिंदी चित्रपटावर मात करण्याचे यश संपादन केले आहे.