समाजाने केलेले संस्कार, दिलेली प्रामाणिकपणाची आणि सात्विकतेची शिकवण या आधारावर मी राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी दिली.
आर्य वैश्य संस्थेतर्फे आयोजित वधू-वर आणि पालक मेळाव्याचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष किशोर यंबरवार, उपाध्यक्ष राजेश मामीडवार, सुषमा बंडेवार, खजिनदार उदय भास्करवार, शेखर झिरपेलवार, डॉ. गजानन पद्मावार, शैलेश काशेटीवार, आशीष पालारपवार, सुधाकर आईन्चवार या वेळी उपस्थित होते. विवाह जुळविण्यासाठी संस्थेतर्फे विकसित करण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
मुनगंटीवार म्हणाले, राज्यावर आजघडीला हजारो कोटी रुपयांचे कर्ज आहे. २७ हजार कोटी रुपये व्याजापोटी द्यावे लागतात. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणि अनुभव याच्या बळावर राज्याची आर्थिक घडी सुरळीत करण्याचे ध्येय गाठावे लागेल.
आपला विवाह चंद्रपूर येथील वधू-वर सूचक मेळाव्यातूनच जुळला. योगायोगाने या मेळाव्याचा अध्यक्षही मीच होतो, अशी आठवणही मुनगंटीवार यांनी सांगितली.