नऱ्हे गावातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या डेल्टामन इलेक्ट्रिकल्स या कारखान्यात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरटय़ांना विरोध करणाऱ्या बागकाम कामगारावर विटांनी हल्ला करण्यात आला. या प्रकारात या कामगाराचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या गुन्ह्य़ात याच कारखान्यातील एका कामगारासह तिघांना सिंहगड रस्ता पोलिसांनी दहा तासातच गजाआड केले.
उत्तम शिवराम चव्हाण (वय ६०, रा. नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी याच कारखान्यात काम करणारा प्रदीप जाधव (वय १९, रा. गोर्हे खुर्द) याच्यासह तिघांना अटक केली आहे. कारखान्यातील रखवालदार रामदुलारे मंगल यादव (वय ६०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे कारखान्यात बागकाम कामगार म्हणून कार्यरत होते. ते औद्योगिक वसाहतीत राहात होते, मात्र कुटुंबात काही वाद झाल्याने ते चार-पाच दिवसांपासून कंपनीतच झोपत होते. घटनेच्या रात्री चव्हाण व यादव हे रात्रपाळीवर होते.
रात्री साडेदहाच्या सुमारास दोघांना कारखान्याच्या मागील बाजूला काही तरी आवाज आल्याने ते मागे गेले. त्या वेळी तीन चोरटे बंद खोलीचा दरवाजा उघडून अ‍ॅल्युमिनिअमचे साहित्य असलेली पोती घेऊन बाहेर जाताना दिसले. दोघांनी त्यांना हटकले. त्यातील एक कारखान्यातील कामगारच असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. दोघांनी विरोध केल्याने चोरटय़ांनी तेथून पळ काढला, पण जाताना जिवे मारण्याची धमकीही दिली.
मध्यरात्रीनंतर चव्हाण झोपले असताना हे चोरटे हातात विटा घेऊन पुन्हा आले. त्यांनी चव्हाण यांना लाथाबुक्क्य़ांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर दगड व सिमेंटच्या विटांनी प्रहार केला. चव्हाण यांच्या खिशातील रोख रक्कम व अ‍ॅल्युमिनियमचे एक पोते घेऊन चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मििलद मोहिते, वरिष्ठ निरीक्षक विष्णू जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. एक आरोपी कारखान्यातील कामगार असल्याचे कळल्याने तातडीने तपास सुरू झाला. सहायक निरीक्षक बापू िपगळे, जुबेर मुजावर, देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक धुळाजी कोळपे, शिवदास गायकवाड, सहायक उपनिरीक्षक कैलास मोहोळ, यशवंत ओंबासे, किरण देशमुख, पांडुरंग जगताप, राम पवार, प्रशांत काकडे आदींच्या पथकाने आरोपींना गजाआड केले.