प्राच्यविद्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नावलौकिक संपादन केलेली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था लोकाभिमुख होत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देणार आहे. एरवी वेगवेगळ्या ज्ञानशाखांतील संशोधनाच्या माहितीपर गंभीर विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करणाऱ्या संस्थेतर्फे आता जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या सुश्राव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
भांडारकर संस्था आता शताब्दीकडे वाटचाल करीत आहे. संस्थेची स्थापना ६ जुलै १९१७ रोजी झाली असली, तरी प्राच्यविद्या क्षेत्रातील संशोधन कार्य करणारी अशा स्वरूपाची संस्था स्थापन करावी याची मुहूर्तमेढ १९१५ मध्येच रोवली गेली. त्या घटनेचे शताब्दी वर्ष सुरू असल्यामुळे आगामी तीन वर्षे शताब्दीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सोमवारी (१५ सप्टेंबर) बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सायंकाळी होणारा ‘गीर्वाण स्वरोत्सव’ हा त्याचाच एक भाग आहे. संस्कृतला केंद्रस्थानी असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्ती होत आहे. संस्थेच्या सभासदांना सामावून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या मानद सचिव डॉ. मैत्रेयी देशपांडे यांनी दिली. अशा स्वरूपाची मैफल संस्थेच्या इतिहासामध्ये प्रथमच होत आहे. यापूर्वी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त संस्कृत नाटकांचे प्रयोग करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.
पर्जन्याची संस्कृत भाषेतील काही रूपे मांडणारा, त्याचप्रमाणे स्तोत्रवाङ्मय, अष्टपदी, संस्कृत बंदिशी, नवग्रह-षोडशोपचार असे वैविध्य दर्शविणारा गीर्वाण स्वरोत्सव डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या स्वरांतून सजणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन जयश्री बोकील यांचे आहे. प्रसाद पाध्ये, अमित पाध्ये, मानसकुमार, महेंद्र शेडगे हे डॉ. अश्विनी भिडे यांना साथसंगत करणार असून धनश्री घैसास आणि स्वरांगी मराठे स्वरसाथ करणार आहेत.