रवींद्र खरे , संगीत नाटकातील अभिनेते

शनिवार पेठ मेहुणपुऱ्यातील वाडय़ात आम्ही रहायचो. त्यामुळे घरामध्ये आजूबाजूच्या लोकांचे सतत येणे-जाणे असायचे. माझ्या आईला (पुष्पा खरे) वाचनाची आवड होती. त्यामुळे आम्हाला आíथकदृष्टय़ा परवडणाऱ्या नसल्या, तरीही ‘स्वामी’सह काही कादंबऱ्या आणि ‘गीतरामायणा’च्या ध्वनिमुद्रिका घरामध्ये होत्या. आईची वाचनाची आवड तिने स्वत: तर जोपासलीच, परंतु आजूबाजूच्या बायकानांही वाचनाची गोडी लावली. आई स्वत: वाचायची आणि इतरांना वाचून दाखवायची. त्यामुळे घरातूनच किंबहुना आईकडून मला वाचनाचे बाळकडू मिळाले. नाटय़सृष्टीमध्ये काम करण्यासोबत अनेक ठिकाणी व्याख्यान देण्याकरिता मी जातो. तेव्हा अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते आपले देव अशा विविध विषयांचा त्यामध्ये समावेश असतो. तर, रंगमंचावर काम करताना प्रबोधनात्मक विषयांसह मनोरंजनात्मक विषयही रसिकांसमोर सादर होतात. त्यामुळे रामायण, महाभारतापासून ते पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांपर्यंत शेकडो पुस्तकांचे वाचन केल्याने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मी नवनवीन गोष्टी शिकत गेलो.

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

आई वाचनालयाची सभासद असल्याने लहानपणी मीही तिच्यासोबत जात असे. त्यामुळे तिने एक अंक घेतला, तरी मी दोन-तीन अंक तेथेच बसून वाचून काढायचो. किशोर, बालमित्र आणि चांदोबासारखे अंक वाचायची मला फार हौस होती. वाचनाची तेव्हा लागलेली सवय आजही तितकीच ताजी आणि टवटवीत आहे. नोकरी करीत असल्याने वडील दिवसभर घराबाहेर असायचे. त्यांच्याव्यतिरिक्त मी, माझे मोठे बंधू (माधव खरे) आणि आई अशा घरातील प्रत्येक सदस्याच्या हातात पुस्तके असायची. अनेकदा दिवाळी अंक आणि मासिक पहिल्यांदा कोणी वाचायचे, यावरून आमच्यात भांडणदेखील होत असत.

अप्पा बळवंत चौकातील नू. म. वि. प्रशालेत असताना वक्तृत्व, उतारा पाठांतर अशा अनेक स्पर्धामध्ये मला बक्षिसे मिळाली. वर्गामध्ये ज्याला वाचनाची आवड असे, अशा विद्यार्थ्यांला हेरून आमचे शिक्षक आम्हाला स्पर्धाना पाठवायचे. त्यामुळे वाचनाचा छंद वृद्धिंगत होण्यामध्ये या स्पर्धाचा वाटादेखील मोठा होता. पुस्तक वाचनाची आवड असल्याने शाळेच्या ग्रंथालयामध्ये नियमित जाणे होत होते. त्यामुळे तेथील ग्रंथपाल ओळखायचे. शाळेमध्ये असताना श्यामची आई हे पुस्तक माझ्या आवडीचे. त्यासोबतच ना. धों. ताम्हणकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे या लेखकांची पुस्तके वाचायला सुरुवात झाली. इयत्ता सहावीत असतानाच मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘माझी जन्मठेप’ पुस्तक वाचले. सुरुवातीची काही पाने वाचली की त्या विषयाशी आपले नाते जोडले जाते. त्यातूनच वाचनाची आवड वाढते. त्यामुळे सावरकरांविषयीची पुस्तके वाचायची आवड तेव्हापासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. वाचन हे जेव्हा चिंतन या पातळीवर जाते, तेव्हाच त्याची खरी किंमत समजते, ही माझी धारणा होती. त्यामुळे गरवारे महाविद्यालयात असताना मी बहुतांश टक्के वेळ ग्रंथालयातच घालवत असे.

नाटय़क्षेत्रात माझे पदार्पण झाले ते ‘ड्रॉपर्स’ या संस्थेच्या माध्यमातून. वयाच्या १८ व्या वर्षीच डॉ. जब्बार पटेल, सत्यदेव दुबे यांसारख्या दिग्गजांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांचा अभ्यास दांडगा होता, त्यामुळे वाचनाचे महत्त्व त्यांच्याकडून समजले आणि मी पुस्तकांच्या आणखी जवळ जाऊ लागलो. वासुदेवराव पाळंदे हे नाटय़विचार मांडायचे. त्यामुळे शब्दांचे अन्वयार्थ, शब्दातील अंतरीचा भाव आणि जे वाचू त्यातील नेमकेपणा कसा घ्यायचा या गोष्टी हळूहळू समजू लागल्या. त्यामुळे माझे वाचन रंगतदार होत गेले. वाचनामुळे मी केवळ नाटय़ क्षेत्राशीच नाही तर निवेदन, निरुपण आणि व्याख्यान अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांची आत्मचरित्र वाचली. प्रत्येक पुस्तक तटस्थपणे वाचल्याने त्याचा फायदा झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संतचरित्र अशा विविध विषयांवर व्याख्यान देत असल्याने रामायण, महाभारत, कृष्णचरित्रासह महापुरुषांची चरित्रे माझ्या वाचनात आली. वाचताना मी आवश्यक त्या नोंदी काढत असे. त्यामुळे कोणत्याही श्रोत्याने प्रश्न विचारला तरी संदर्भ सांगणे मला सहज शक्य होते.

नाटकांविषयी विद्याधर गोखले, वसंत कानेटकर यांच्या पुस्तकांचे वाचन मी केले. त्यांचा सहवास लाभल्याने त्यांच्याशी बोलायचो. त्यांच्याकडून नाटकाविषयी विवेचन ऐकण्याची संधी मिळाली. त्यामुळे नाटकांविषयीची पुस्तकेदेखील मी माझ्या संग्रही ठेवू लागलो. मुंबईहून दुर्मीळ पुस्तकेही आणत असे. सदाशिव पेठेतील भरत नाटय़ संशोधन मंदिरात नाटयसंग्रहाविषयी शेकडो पुस्तके आहेत. नाटक या विषयाला वाहिलेली पुस्तके येथे अनेकजण आणून देतात. त्यामुळे गेल्या ४० वर्षांमध्ये भरत नाटय़ मंदिरातील ग्रंथालयाशी माझे नाते अधिकच घट्ट झाले. पुणे मराठी ग्रंथालय आणि बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिराजवळील आठवले यांच्याकडे मी पुस्तक खरेदीसाठी आवर्जून जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक पुस्तके भेट म्हणून मिळतात. त्यातील काही पुस्तके पुण्यातील सार्वजनिक वाचनालयांना हवी असल्यास देतो. एका पुस्तकाच्या प्रेमात पडायला मला आवडत नाही. त्यामुळे नाटक, संतगाथा आणि इतरही अनेक प्रकारची पुस्तके माझ्या बुकशेल्फमध्ये आहेत.

दूरचित्रवाणीपेक्षा वाचनातून एखाद्या घटनेचे चित्र रंगविण्यात अधिक आनंद मिळतो. पुस्तक वाचनामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते. समाजातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांकडे वाचनाचा गुण असल्याने ते आज या स्थानावर पोहोचू शकले. दूरचित्रवाणीवरील तेच ते विषय सारखे पाहून त्या वाहिनीचा ‘टीआरपी’ वाढविण्यापेक्षा वाचनाने आपल्या बुद्धीचा टीआरपी वाढविणे मला जास्त आवडते. त्यामुळे मिळेल त्या वेळेत आणि वेगवेगळी पुस्तके मी वाचतो. समाजाचा तोल राखायचा असेल, तर वाचन महत्त्वाचे आहे. त्यामुळे नाटक आणि व्याख्यानातून वाचनासंबंधीचे महत्त्व कळत नकळत आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ