पहिल्याच स्वरापासून रसिकांच्या हृदयाचा घेतलेला ठाव.. स्वरांशी लडिवाळ खेळ करीत घेतलेली आलापी.. दोन आलापींमधील जागा भरून काढत गाणारे व्हायोलिनचे सूर.. ‘हुसेनी तोडी’ आणि ‘सुखिया बिलावल’ अशा अनवट रागांची प्रस्तुती करीत झालेले घराणेदार गायन.. सारे कान जणू ‘गानसरस्वती’ची मैफल ऐकण्यासाठी आसुसलेले होते. वातावरण भारून टाकणाऱ्या किशोरीताई आमोणकर यांच्या मैफलीने रसिक श्रोते तृप्त झाले. निवडणूक प्रचाराची सांगता आणि रविवारच्या सुट्टीची सकाळ याचाही त्यांना विसर पडला.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या अभिजात शास्त्रीय संगीतातील योगदानाला मानवंदना देण्याच्या उद्देशातून नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘गानसरस्वती महोत्सवा’त रविवारी खुद्द किशोरी आमोणकर यांच्या सकाळच्या रागगायनाची मैफल झाली. ‘गानसरस्वती’च्या आगमनाची रसिक जणू ठीक नऊ वाजल्यापासूनच प्रतीक्षा करीत होते. अमोल पालेकर दिग्दर्शित ‘भिन्न षड्ज’ या लघुपटातील काही तुकडे पडद्यावर दाखविले जात असले तरी रसिकांना किशोरीताईंच्या आगमनाची उत्कंठा होती. काही वेळातच किशोरीताई स्वरमंचावर आल्या आणि या ‘गानसरस्वती’च्या अलौकिक स्वरचांदण्याचा आनंद लुटताना दुपारचा एक कधी वाजला हे रसिकांनाही समजले नाही. नंदिनी बेडेकर आणि तेजश्री आमोणकर या शिष्यांनी तानपुरे जुळवले. हाती स्वरमंडल घेतलेल्या ताईंनी पहिली आलापी घेतली तेव्हा काहीतरी वेगळे ऐकायला मिळणार याची चाहूल रसिकांना लागली. ‘हुसेनी तोडी’ रागातील ‘निरंजन की जे’ हा झपतालातील बडा ख्याल किशोरीताईंनी सादर केला आणि जयपूर घराण्याच्या गायकीचे सौदर्य उलगडणाऱ्या या गायनातून आनंदरस पाझरत होता.

नंदिनी बेडेकर आणि तेजश्री आमोणकर यांच्यासह रघुनंदन पणशीकर यांनी स्वरसाथ केली. सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीची, मिलिंद रायकर यांनी व्हायोलिनची आणि भरत कामत यांनी तबल्याची समर्पक साथसंगत केली. मध्यंतरानंतर किशोरीताई यांनी ‘सुखिया बिलावल’ रागातील ‘देवी दुर्गे’ ही बंदिश सादर केली. ‘अल्हैया बिलावल’ रागातील ‘डगर चलत मोरी’ ही अध्धा तीनतालातील स्वरचित बंदिश सादर करीत या मैफलीची सांगता झाली तेव्हा रसिकांनी उभे राहून टाळय़ांचा कडकडाट करीत ‘गानसरस्वती’ला अभिवादन केले.

..म्हणून मी बंदिशी करते

काही अस्थाई आणि राग हे एकमेकांच्या भावनेशी जुळत नाहीत असे मला वाटते. म्हणूनच मी बंदिशी करते. आवश्यकता भासते तेव्हाच मी बंदिशी बांधते, अशी भावना किशोरी आमोणकर यांनी व्यक्त केली. अनेक मैफलींमध्ये कलाकार माझ्या बंदिशी सादर करतात. पण त्या कोठून आल्या हे सांगत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.