बाणेर, बालेवाडीतील सातशे कुटुंबांची आगळी संस्था

आपल्या भागातील समस्या आणि प्रश्न सोडवायला कशाला कोणाची मदत घ्यायची, चला एकत्र येऊन आपले प्रश्न आपणच सोडवूया, या उद्देशाने बाणेर-बालेवाडी भागातील जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘माय लाईफ फाउंडेशन’ या चळवळीला चांगले यश मिळाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.

महापालिकेसह अनेक शासकीय यंत्रणांशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नागरिक कोणावर तरी अवलंबून राहतात. कोणाकडे तरी पाठपुरावा करतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोणाकडून तरी प्रश्न सोडवून घेण्यापेक्षा आपणच एकत्र येऊन प्रश्न सोडवूया, असा विचार बालेवाडीतील सुदर्शन जगदाळे यांनी केला आणि त्यांनी त्यांच्या सोसायटीपुरती या संस्थेची स्थापना तीन वर्षांपूर्वी केली. तेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून जगदाळे संगणक अभियंता आहेत. पाणी, ड्रेनेज, रस्ते यासह अनेक समस्या या भागात होत्या. त्या सोडवण्यासाठी त्यांनी रहिवाशांना एकत्र केले आणि हळूहळू प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. नागरिक स्वत:हून पाठपुरावा करू लागल्यानंतर प्रश्न सुटण्याच्या दिशेने पावले पडू लागली आणि काही प्रश्न सोडवण्यात नागरिकांना यश आले.

संस्थेच्या माध्यमातून यश मिळू लागल्यानंतर जगदाळे यांनी हे काम अधिक विस्तारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बाणेर, बालेवाडीतील अनेक सोसायटय़ांनी सक्रिय साथ दिली. एकेक करत या संस्थेशी आतापर्यंत सातशे कुटुंबं जोडली गेली आहेत. त्यातील बहुतेक सर्व जण उच्चशिक्षित, तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. स्थानिक वेगवेगळ्या प्रश्नांबाबत हे सर्व जण सातत्याने आवाज उठवतात. ते प्रश्न कोणत्या माध्यमातून सोडवायचे याची कायदेशीर माहितीही घेतली जाते. त्यानुसार त्या त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन प्रश्न मांडले जातात. त्यामुळे प्रशासनाकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. नागरिकांच्या या सक्रियतेमुळे अधिकाऱ्यांनाही आता संस्थेचे काम माहिती झाले आहे.

केवळ प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष एवढय़ावरच ही संस्था थांबलेली नाही, तर या कामबरोबरच आपण समाजाचे घटक असल्यामुळे समाजासाठी आपणही काही तरी केले पाहिजे या जाणिवेतूनही ही संस्था काम करते. सोसायटय़ांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी आरोग्य शिबिरे, मोकळ्या जागांवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यासह अनेक कार्यक्रम संस्थेतर्फे आतापर्यंत आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांमध्येही उच्चशिक्षित मंडळी आवर्जून सहभागी होतात आणि काही ना काही काम करतात. अशा काही महत्त्वाच्या उपक्रमांबरोबरच संस्थेच्या सभासदांसाठी कधी प्रभात फेरी, कधी क्रीडा स्पर्धा अशाही प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात आणि त्यालाही मोठा प्रतिसाद मिळतो.