दाभोलकर हत्याप्रकरणी डॉ. हमीद दाभोलकर यांची मागणी

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित असलेल्या सारंग अकोलकर, वीरेंद्र तावडे या सनातन संस्था आणि हिंदूू जनजागृती समितीच्या फरार साधकांना ताबडतोब अटक करून पुढील चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी गुरुवारी केली.

सीबीआयने सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर आणि हिंदूू जनजागृती समितीच्या वीरेंद्र तावडे यांच्या घरी बुधवारी (१ जून) छापे टाकले. या वेळी तपास यंत्रणेला दोघांच्याही घरातून काही संशयित कागदपत्रे आणि वस्तू मिळाल्या आहेत. त्या संदर्भात हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. राज्यामध्ये धर्माध शक्तींची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे नेमकी कोणती संस्था आहे हे शोधून मुख्यमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्नही हमीद दाभोलकर यांनी उपस्थित केला.  दाभोलकर यांचा खून होऊन पावणेतीन वर्षे उलटून गेली तरीही तपास यंत्रणांची कामगिरी समाधानकारक नव्हती. २००८ पासून फरार असलेल्या तसेच मडगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आलेल्या सारंग अकोलकर, रुद्र पाटील, प्रवीण िलबकर, जयप्रकाश हेगडे या सनातन संस्थेच्या साधकांची या प्रकरणात नावे समोर येत होती. मात्र, तरीही कारवाई करण्यात आली नव्हती, याकडे लक्ष वेधून हमीद दाभोलकर म्हणाले, तावडे आणि अकोलकर यांच्या घरी छापा टाकून सीबीआयच्या हातामध्ये काही संशयास्पद गोष्टी लागल्या आहेत. त्यामुळे तपासाला वेग आला असल्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. नरेंद्र दाभोलकर, गोिवद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या खुनामध्ये साम्य आहे. अकोलकर, तावडे अटकेमुळे तीनही प्रकरणांच्या तपासाला वेग येईल.  दाभोलकर खून प्रकरणातील संशयित सारंग अकोलकर हा माझ्या संपर्कात आहे असे सनातन संस्थेचे वकील संजय पुनाळेकर जाहीरपणे सांगत आहेत. त्यांनी त्वरित अकोलकरची माहिती तपास यंत्रणांना द्यावी अन्यथा पुनाळेकर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हमीद दाभोलकर यांनी केली.