सरदार सरोवरामुळे झालेल्या नर्मदा खोऱ्यातील विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकार केवळ संवादहीनच नाही तर, संवेदनाहीनही झाले आहे, अशी टीका नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शुक्रवारी केली. त्यातुलनेत महाराष्ट्र सरकार किमान संवादी आहे, असेही त्या म्हणाल्या. सरदार सरोवराच्या कार्यक्रमात आंदोलन करणाऱ्या एक हजार लोकांना अटक करून आणि दोनशे आंदोलकांना पोलीस कोठडीत ठेवून मोदी यांना वाढदिवस साजरा करावा लागला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नर्मदा बचाओ आंदोलन समर्थन गटातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘सरदार सरोवराचे सत्य-नर्मदा खोरे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत’ या विषयावर पाटकर यांनी संवाद साधला. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य अध्यक्षस्थानी होते.

पंडित नेहरु यांनी ५६ वर्षांपूर्वी धरणाचा शिलान्यास केला तेव्हा ते धरण छोटे होते. आता आमच्यावर विकासविरोधी असा शिक्का मारला जातो. पण, त्या वेळी जनसंघाने या धरणाला विरोध केला होता, असे सांगून पाटकर म्हणाल्या,की न्यायाधिकरणातर्फे पाणीवाटपाचा तंटा सोडविण्यासाठी लवाद नियुक्त केला जातो. पण, पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार केला जात नाही. विस्थापित गावांनाही भेटी दिल्या गेल्या नाहीत. १९९३ मध्ये धरणाचा पुनर्विचार करण्यासाठी चार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या अहवालानुसार जागतिक बँकेने निधी रोखला होता. आजही पुनर्वसनाचा आराखडा झालेला नाही. विकासाचे समर्थन करणारे सामाजिक आणि पर्यावरणीय पैलूंकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.

स्मार्ट सिटी, पायाभूत सुविधा आणि धरणाची उंची वाढविणे अशा गोष्टींतून विकासाचे भूत सामान्यांच्या मानगुटीवर बसविले जात आहे, अशी टीका करून पाटकर यांनी, विकासासाठी त्याग करायला भाग पाडले जाणारे शरणार्थी होता कामा नयेत याची दक्षता घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या, नर्मदा घाटाच्या पर्यटनाचा ठेका अंबानीला दिला जात आहे. सत्तेवर आल्यानंतर मोदी यांनी धरणाची उंची १७ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला. विस्थापितांची खोटी आकडेवारी शपथपत्रावर सादर केली गेली. चार महिन्यांत ९०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले गेले. विस्थापितच नव्हते तर हे पैसे गेले कोठे? ज्यांना अधिकार नव्हता त्यांच्याही खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा केले गेले. आता गुजरातमध्ये निवडणुका आल्यामुळे सरदार सरोवर प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. सरदार सरोवराच्या मुद्दय़ावर विकासाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक मंचावर येऊन चर्चा करण्यास तयार आहे.

गौरी लंकेशची हत्या हे काळ बिकट आल्याचे लक्षण असून विवेकवादाचा आणि पुरोगामी विचारांचा आवाज अनेक तऱ्हेने दडपला जात आहे, अशी टीका भाई वैद्य यांनी केली.