नक्षलवाद्यांचे पुण्यातील उद्योग वाढीस लागले असून, खडकी येथील दारूगोळा कारखाना आणि अहमदनगर या दरम्यान दारूगोळय़ाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पाळत ठेवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. शरण आलेला नक्षलवादी विक्रांत ऊर्फ विक्रम याने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती उघड झाली आहे.
इतकेच नव्हे तर अशी पाळत ठेवण्यात आल्याचे त्याचबरोबर शरण आलेले इतर तीन नक्षलवाद्यांनी कबीर कला मंचचे शीतल साठे, सचिन माळी, सागर गोरखे आणि रमेश गायचोर हे नोव्हेंबर २०११ ते एप्रिल २०१२ गोंदिया आणि गडचिरोली या भागात सशस्त्र नक्षलवाद्यांसोबत आठ महिने राहिल्याचेही त्याने सांगितले आहे. दहशतवादविरोधी पथकाने या नक्षलवाद्यांचा जबाब उच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यावरून शीतल साठे वगळता तिघांना जामीनअर्ज उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला आहे.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून सचिन माळी, सागर गोरखे आणि रमेश गायचोर अटकेत आहेत. त्यांचा जामीनअर्ज नुकताच, ११ एप्रिल २०१४ रोजी उच्च न्यायालयाने फेटाळला. जामिनासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये चार शरण आलेल्या नक्षलवाद्यांची नावे दिली आहेत. जीवन रामसाई नरोटे, सूरज ऊर्फ गुलाल दर्शन, अमित ऊर्फ मनोज बापू आणि विक्रांत ऊर्फ विक्रम अशी चार साक्षीदारांची नावे दिली आहेत. त्यामध्ये विक्रांत ऊर्फ विक्रम याने दिलेल्या जबाबाची माहिती आदेशात दिली आहे.
दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मे २०११ मध्ये पुणे व ठाणे येथून सात जणांस अटक केली होती. यामध्ये नक्षलवादी व सीपीआय-एमच्या गोल्डन कॉरीडॉर कमिटीची सचिव अन्जलो सोनटक्के हिच्यासह कबीर कला मंच कार्यकर्त्यांना अटक केली होती. राज्यातील मुख्य नक्षलवाद्यांपैकी एक मिलिंद तेलतुंबडे व पुण्यातील दोन तरुण अद्याप फरार  आहेत. या प्रकरणातील काही आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर एप्रिल २०१३ मध्ये सचिन साठे आणि सचिन माळी हे मुंबई येथे शरण आले होते. त्यानंतर रमेश गायचोर आणि सागर गोरखे हे दोघेही मुंबईत शरण आले.
या प्रकरणी एटीएसने उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यामध्ये गडचिरोली येथे काम करणाऱ्या चार नक्षलवादी २०१२ आणि २०१३ पोलिसांना शरण आले होते. या शरण आलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या जबाबामध्ये नोव्हेंबर २०११ ते एप्रिल २०१२ दरम्यान शीतल साठे, सचिन माळी, सागर गोरखे आणि रमेश गायचोर हे सशस्त्र नक्षलवाद्यांसोबत गडचिरोली आणि गोंदिया येथील प्रशिक्षण शिबिरात आठ महिने राहिले असल्याचे सांगितले आहे. त्याच बरोबर, या शरण आलेल्यांपैकी एक विक्रांत ऊर्फ विक्रम याला नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याने पुण्यातील खडकी येथील दारूगोळा फॅक्टरी येथून नगर येथे दारूगोळ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची माहिती काढण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे २०१० आणि २०११ या दरम्यान काही काळ नगर येथे राहून त्याने ही माहिती काढली. तसेच, वर्धाजवळील पुलगाव येथील ‘सेंट्रल अॅम्युनेशन डेपो’ येथून जाणाऱ्या ट्रकची माहिती काढण्यास सांगितले. नक्षलवाद्यांची गोंदिया जिल्ह्य़ातील देवडीगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एखादा दारूगोळ्याचा ट्रक लुटण्याची योजना असल्याची माहिती त्याच्या जबाबात दिल्याचे उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

विक्रांत ऊर्फ विक्रम हा मूळचा यवतमाळचा असून तो आयटीआयचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी असताना तो नक्षलवाद्यांबद्दल सहानभूती असलेल्या ‘देशभक्त युवा मंच’ या संघटनेत सहभागी झाला. त्यानंतर तो सीपीआय-माओवादी या संघटनेत सहभागी झाला. नक्षलवादी संघटनेत सहभागी झाल्यानंतर त्याला मोटार चांगली चालवता येत असल्यामुळे त्याला मिलिंद तेलतुंबडे याने एक मोटार घेऊन दिली. त्या मोटारीतून विक्रम हा जिलेटीन आणि डिटोनेटरची वाहतूक करीत असे. त्याच बरोबर मिलिंद तेलतुंबडेचा चालक म्हणून काम केले आहे. तसेच, तो शहरी आणि जंगल भागातील नक्षलवाद्यांचा ‘कुरियर’ म्हणून काम करीत होता. डिसेंबर २०१२ मध्ये गडचिरोली पोलिसांना तो शरण आला. त्याने दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.