अभिमानश्री सोसायटीतील दोन बंगल्यांना झळ
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारात असलेल्या गवताला रविवारी दुपारी अचानक आग लागली. आवाराला लागून असलेल्या अभिमानश्री सोसायटीतील दोन बंगल्यांच्या गच्चीवर असलेले साहित्य पेटल्याने घबराट उडाली. तेथून काही अंतरावर एनसीएलचे गॅस गोदाम असल्याने आग भडकण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने तेथे धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.
पाषाण रस्त्यावर असलेले एनसीएलचे आवार विस्तीर्ण आहे. जवळपास पन्नास एकर मोकळी जागा आहे. शेजारीच अभिमानश्री सोसायटी आहे. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एनसीएलच्या आवारातील गवताला आग लागली. त्यामुळे मोकळ्या जागेतील लहान झाडांनी पेट घेतला. आग पसरत गेल्याने शेजारी असलेल्या अभिमानश्री सोसायटीतील दोन बंगल्यातील गच्चीपर्यंत पोहोचली आणि गच्चीवर ठेवण्यात आलेल्या साहित्याने पेट घेतला. या सोसायटीत तीस बंगले आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट उडाली. सोसायटीच्या आवारातील दोन नारळाच्या झाडांनी पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. सहा बंब आणि पाण्याचे टँकर तेथे दाखल झाले.
एनसीएलच्या आवारात स्वयंपाकाला लागणाऱ्या गॅसचे गोदाम आहे. आगीची झळ गोदामाला बसल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. चतुश्रृंगी पाणी पुरवठा केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात आला. अग्निशमन दलाचे सहायक विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर, केंद्रप्रमुख शिवाजी मेमाणे, विजय भिलारे, प्रभाकर उमराटकर, जवान जालिंदर मुंजाळ, अंकुश पालवे, सुभाष हंडाळ, बाळासाहेब कारंडे, बलराज संगम, बंडेराव पाटील यांनी आग आटोक्यात आणली.