शिवसेना-भाजपच्या बैठकीत ठोस निर्णय नाही

आम्ही तुटेपर्यंत ताणून धरणार नाही, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे व पिंपरीत काँग्रेसशी आघाडी करण्याची तयारी दर्शवली. तर, भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची वाकडला बैठक झाली. ठोस निर्णय न झाल्याने युतीचा निर्णय गुलदस्त्यातच राहिला.

अजित पवार मंगळवारी पिंपरीत होते. पत्रकारांशी बोलताना पुणे व पिंपरीत महापालिकेत आघाडी करण्यास सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. सन्मानजनक प्रस्ताव असावा आणि ताकद ओळखून जागांची मागणी असावी, अन्यथा स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. आघाडीची चर्चा सुरू असेपर्यंत उमेदवार जाहीर करणार नाही. ज्यांना उमेदवारी दिली जाईल, त्यांना कोणतेही कारण न देता लढावे लागेल. २००४ व २००९ च्या सूत्रानुसार जागावाटप झाल्यास हरकत नाही. विद्यमान  नगरसेवक, नव्याने पक्षात आलेले नगरसेवक, दुसऱ्या क्रमांकाची मते असलेल्या जागा आदी मुद्दे विचारात घ्यावेत. युती होईल किंवा होणार नाही, त्याचा आघाडी होण्याशी काही संबंध नाही, असे पवारांनी निक्षून सांगितले.

वाकडला सात वाजता भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपासाठी बैठक झाली. भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, पिंपरीचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे तर शिवसेनेकडून नेते विनायक राऊत, संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे उपस्थित होते. दोन तास चाललेल्या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली, मात्र ठोस निर्णय झाला नाही. यापूर्वी, आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये पहिली बैठक झाली, त्या वेळी काही मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चा झाली. मात्र, ठरावीक जागांवरून चर्चा बारगळली होती. १५ जानेवारीला दुसरी बैठक होणार होती, मात्र ती होऊ शकली नव्हती. मंगळवारी चर्चा पूर्ण न झाल्याने पुन्हा बैठक होणार आहे.