पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने प्रभागातील कचरा ट्रॅक्टरच्या मदतीने पालिकेच्या मुख्यालयात आणून टाकला आहे. प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक असलेल्या दत्ता साने यांनी कचऱ्याने भरलेला ट्रॅक्टर पालिकेच्या मुख्यालयात आणून रिकामी केला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागातील कचरा उचलत जात नसल्याचा आरोप करत दत्ता साने आक्रमक झाले.

प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक दत्ता साने आणि त्यांचे कार्यकर्ते ट्रॅक्टरमधून महापालिकेच्या मुख्यालयात आले. दत्ता साने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मुख्यालयात कचरा टाकत आंदोलन केले. साने यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली.
‘प्रभागात १५-१५ दिवस घंटागाडी येत नसल्यामुळे कचरा उचलला जात नाही. त्यामुळे प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यासंबंधी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात,’ असा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक साने यांनी दिली. ‘नागरिकांनी टाकलेला कचरा पालिकेकडून उचलण्यात येत नसल्यामुळे लोकांना त्रास होतो आहे. परिसरात दुर्गंध पसरल्यामुळे रोगराई होण्याची शक्यता आहे. याचा त्रास नगरसेवक म्हणून मला सहन करावा लागतो आहे,’ असेही साने यांनी म्हटले.

आज (गुरुवारी) दुपारी दीडच्या सुमारास राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रभागातील कचरा पालिका मुख्यालयात आणून टाकला. या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा साने यांनी व्यक्त केली. यानंतरही पालिका प्रशासनाने प्रभागातील कचरा न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारादेखील साने यांनी दिला.