कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे कारण देत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन आठवडय़ांपूर्वी पिंपरी पालिका सभा तहकूब केली होती. वेगळ्या पद्धतीने त्याचीच पुनरावृत्ती करण्यात आली. स्वतंत्र विदर्भाला विरोध व अखंड महाराष्ट्राच्या मागणीसाठी सभा तहकूब करण्याची भूमिका या वेळी राष्ट्रवादीने घेतली. मात्र, सभेचे कामकाज सुरू करण्यावर महापौर ठाम राहिल्यानंतर राष्ट्रवादीचे सदस्य सभागृह सोडून निघून गेले. ‘एकाकी’ पडलेल्या महापौरांनी अखेर अनिच्छेने सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.
पिंपरी महापालिकेची २० जुलैची नगर जिह्य़ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करून तहकूब करण्यात आली. त्यानंतर, महापौरांनी नगरसेवक व कार्यकर्त्यांसह प्रवेशद्वारावर ‘अचानक’ आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली. तेव्हाची तहकूब सभा शुक्रवारी होती. या वेळी अखंड महाराष्ट्राच्या मुद्दय़ावर प्रशांत शितोळे यांनी सभा तहकुबीची मागणी केली, त्यास नारायण बहिरवाडे, तानाजी खाडे यांनी अनुमोदन दिले. तथापि, महापौरांना सभेचे कामकाज पूर्ण करायचे होते. विदर्भाच्या मुद्दय़ावर सभा तहकूब करता येणार नाही, असे विधान महापौरांनी केले. तथापि, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सभा तहकूब करण्याचा ‘पक्षादेश’ होता. तर, विरोधी पक्षाचे सदस्य सभा व्हावी, या हेतूने सभागृहात बसून होते. महापौर ऐकत नसल्याचे पाहून राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहाच्या बाहेर जाऊ लागले, तेव्हा महापौरांचा नाइलाज झाला. सभा तहकूब करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिला नाही. एकाकी पडलेल्या महापौरांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर करताच विरोधी नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला.

दुहेरी निष्ठेच्या कात्रीत महापौर
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ‘दुहेरी निष्ठे’च्या कात्रीत सापडलेल्या महापौरांची शुक्रवारी सभेत केविलवाणी अवस्था झाली होती. सत्तारूढ राष्ट्रवादीच्या सदस्यांनीच त्यांना वाऱ्यावर सोडले होते. २० जुलैची सभा तहकूब केल्यानंतर २५ जुलैला सभा होईल, असे महापौरांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात, सत्ताधाऱ्यांकडून त्यांना पाच ऑगस्टला सभा घेण्यास सांगण्यात आले. आजही सभेचे कामकाज पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाने तहकुबीचे आदेश दिले.