नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी सुनावले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पुढील काळात होणाऱ्या प्रत्येक बठकीला नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी हजर राहिले पाहिजे. कोणत्याही पत्राची किंवा निरोपाची वाट पाहू नका. एखादी गोष्ट पटली नाही तर ती मनात ठेवा. मात्र बठकांना दांडी मारून पक्षाची बदनामी करू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सोमवारी सुनावले.
महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेता शंकर केमसे, माजी महापौर, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक, सर्व आघाडय़ांचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकत्रे या बैठकीला उपस्थित होते. शहराध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण यांची फेरनिवड झाल्यानंतर त्यांनी बोलावलेल्या काही बैठकांना नगरसेवक उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला होता. पक्षातील या वादाची दखल घेऊन बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले, की अलिकडे पक्षाच्या बैठकीसाठी मला निरोपच आला नाही, मला बोलावलेच नाही, अशी कारणे सांगितली जातात. मात्र आपण सगळे राष्ट्रवादीचे कार्यकत्रे आहोत. बैठक आहे हे समजल्यावर मला पत्रच नाही मिळाले, निरोपच नाही मिळाला, ही कारणे न सांगता उपस्थित राहिले पाहिजे. माझा पक्ष ही भावना निर्माण झाली पाहिजे.
पक्षातील ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे. महिलांचा आदर केला गेला पाहिजे. स्वत: पवारसाहेब त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच त्यांनी महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर ती मनात ठेवा. अध्यक्षांनी बोलाविलेल्या बैठकीला नगरसेवक उपस्थित राहत नसल्याच्या बातम्या येतात. बातम्या देणे हे वृत्तपत्रांचे काम आहे, मी त्यांना दोष देत नाही. मात्र आपल्या अशा प्रकारच्या निर्णयांमुळे पक्षाची बदनामी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे असेही पवार यांनी बैठकीत सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अनुभवी नगरसेवकांबरोबर नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी नव्या कार्यकारिणीत महिला आणि तरुणांना अधिक संधी देण्याची सूचना बैठकीत दिली. सार्वजनिक वाहतूक, कचरा प्रश्न, पाणीपुरवठा या विषयांकडे अधिक लक्ष द्या. केंद्राच्या चुकीच्या निर्णयांचे पडसादही लगेच उमटले पाहिजेत.

अजित पवार म्हणाले..
* बैठकीच्या निरोपाची वाट पाहू नका
* शहराच्या विषयांकडे अधिक लक्ष द्या
* काम करताना माझा पक्ष ही भावना असू दे