खबरबात – राष्ट्रवादी, पुणे

गेल्या दहा वर्षांपासून पुणे महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान या निवडणुकीत आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी पुण्यातच तळ ठोकला आहे. सत्ताप्राप्तीसाठी पक्षाकडून तयारी सुरू आहे आणि व्यूहरचनाही आखण्यात येत असल्या तरी पक्षातील अंतर्गत वाद, प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांमधील विसंवाद हे आव्हान पक्षापुढे आहे. पक्षांतर, भारतीय जनता पक्षाचा वाढता जनाधार आणि काँग्रेस बरोबर आघाडी करण्याबाबत सुरू झालेली चर्चा, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून महापालिकेतही पक्षाला चांगले यश मिळण्यास सुरुवात झाली. सन २००२ पासून राष्ट्रवादीने महापालिकेत पाय रोवण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच गेली दहा वर्षे राष्ट्रवादीकडेच महापालिकेच्या कारभाराची सूत्रे राहिली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात असल्यामुळे राष्ट्रवादीचा विस्तारही झपाटय़ाने झाला. त्यातूनच काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले. या पण या सर्व घडामोडीत कार्यकर्त्यांची ताकद आणि एकजूट महत्त्वाची ठरली होती. त्यानंतर मात्र शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दुफळी असल्याचे चित्र सातत्याने पुढे आले. पक्षांतर्गत राजकारण, मतभेद, हेवेदावे यांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली. हीच बाब राष्ट्रवादीसाठी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चिंताजनक ठरणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सुरु आहे. पक्षातील वाद हे काही ठरावीक मुद्दय़ांवर असल्याचा दावा करण्यात येत असला आणि सध्या सर्वाना एकत्रित आणण्यासाठीचे प्रयत्न पक्षाच्या नेत्यांकडून होत असले तरी या विसंवादाचा फटका राष्ट्रवादीला बसणार असून निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दय़ांवर हे वाद उफाळून येण्याची चर्चाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

महापालिकेची यावेळची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात होणार आहे. महापालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी असली तरी या आघाडीत अनेकदा काँग्रेसची फरफट होईल, त्यांची ताकद कशी कमी होईल, याचाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आघाडीत वितुष्ट आले आणि दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. पुन्हा आघाडीची चर्चा दोन्ही पक्षात सुरु झाली आहे. पण आघाडीच्या चर्चेने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आता भारतीय जनता पक्षाचे मोठे आव्हान राष्ट्रवादीपुढे आहे. पक्षातील काही नगरसेवक, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, ही बाबही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागली आहे. पक्षाचा बालेकिल्ला राखण्यासाठी पक्षाचे नेते अजित पवार हे पुण्यात तळ ठोकून आहेत. त्यांच्या सततच्या विधानातूनही ही बाब अधोरेखित झाली आहे. अन्य पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, ही पक्षासाठी समाधानाची बाब आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व्यूहरचना आखण्यात येत असली तरी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये चांगले वातावरण तयार करण्याचे काम पक्षाला करावे लागणार आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी

२०१२   ५४ नगरसेवक

२००७   ४८ नगरसेवक