टीकेकडे दुर्लक्ष; अधिकाऱ्यांची लपवाछपवी
अभ्यासाच्या नावाखाली होत असलेली सहलींची परंपरा कायम ठेवून पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांच्या नेतृत्वाखाली १४ जणांचा सिक्कीम दौरा झाला, त्यावरून बरीच टीका झाली. शिवसेनेने पालिका सभेत त्या विषयावरून आंदोलनही केले. मात्र, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून पालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्या नेतृत्वाखाली सहा नगरसेविकांचे पथक पुन्हा सिक्कीमला रवाना झाले आहे. त्यासाठी चार लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. या दौऱ्याची माहिती लपवण्यासाठी अधिकाऱ्यांची बरीच कसरत सुरू होती.
महापौरांच्या नेतृत्वाखालील १४ जणांनी सिक्कीमचा दौरा नुकताच पूर्ण केला. त्यावरून महापौरांवर बरीच टीका झाली. राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याच्या हेतूने शिवसेनेने पालिका सभेतच आंदोलन केले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून मंगला कदम यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचा गट पुन्हा सिक्कीमच्या दौऱ्यावर गेला आहे. या सहाही नगरसेविका राष्ट्रवादीच्या आहेत. यापूर्वीच्या दौऱ्यातच त्या सहभागी होणार होत्या. मात्र, अजितदादांचा दौरा असल्याने पक्षनेता या नात्याने कदम यांना दौऱ्यावर जाता येत नव्हते. तरीही महापौर तेव्हा सिक्कीमला गेल्या होत्या. तेव्हाचा राहिलेला दौरा पूर्ण करण्यासाठी या नगरसेविका सोमवारी रवाना झाल्याचे सांगण्यात येते. या दौऱ्यासाठी तीन लाख ८० हजार रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती देताना अधिकारी टाळाटाळ करत होते. नगरसचिव कार्यालयाकडे विचारणा केली असता, हा पर्यावरण
विभागाचा विषय असल्याचे सांगण्यात आले. तर, पर्यावरण विभागात चौकशी केल्यानंतर, नगरसचिव कार्यालयात माहिती मिळेल, असे सांगण्यात येत होते.

महिला बालकल्याण समितीचा ‘केरळ दौरा’
महापौर, पक्षनेत्यांचे अभ्यासदौरे कमी होते म्हणून की काय, महिला बालकल्याण समितीच्या वतीने केरळला ‘अभ्यास’ दौऱ्याचा घाट घातला आहे. येत्या ९ ते १६ जून दरम्यान समितीचे नऊ सदस्य केरळला जाणार आहेत. या दौऱ्यासाठी पाच लाख रुपये खर्च करण्यात येणार असून स्थायी समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. तेथील बाजारपेठ, उद्योगांची पाहणी तसेच उद्योजकांच्या भेटी घेत समितीचे सदस्य ‘अभ्यास’ करणार आहेत.