आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले. पाठोपाठ त्यांचे समर्थक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले. आता माजी महापौर आझम पानसरे यांनी समर्थकांसमवेत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. हे सत्र इथेच संपणार नाही. आणखी काही नेते व नगरसेवकांचा मोठा गट भाजपच्या उंबरठय़ावर असल्याने राष्ट्रवादीच्या नशिबी आणखी एक वेळ मोठे खिंडार आहे. एक वेळ अशी होती, की भाजपकडे मोजकेच कार्यकर्ते होते. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळत नव्हते. ‘मोदी लाटे’नंतर चित्र बदलले. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीकडून ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचे लोंढे भाजपमध्ये येत आहेत, ते पाहता भाजपची ‘राष्ट्रवादी’ होऊ लागली आहे. भाजपचा जो पारंपरिक वर्ग आहे, त्यांनाही आपल्या अस्तित्वाची काळजी वाटू लागली आहे. भाजपची शिस्त, ध्येय-धोरणे, विचारसरणी याचा दुरान्वये संबंध नसलेली मंडळी भाजपमध्ये आल्याने ‘पाटी विथ डिफरन्स’ नावापुरती राहिली आहे. जे कालपर्यंत राष्ट्रवादीत होत होते, तेच भाजपमध्ये सुरू झाल्यास आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादीने केलेला भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊन पिंपरीत निवडणूक लढवू पाहणाऱ्या भाजपच्या गोटात दाखल होणाऱ्या मंडळींचे पूर्वकर्तृत्व तपासून पाहिल्यास भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ापासून भाजपला फारकत घ्यावी लागेल.

[jwplayer lIbk7RZD]

What Jayant Patil Said?
भाजपासह सत्तेत जायचं हा निर्णय शरद पवारांचा की अजित पवारांचा ? जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीत…”
sunetra pawar and supriya sule
ठरलं! बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होणार; सुनिल तटकरे म्हणाले, “मी अधिकृतपणे सांगतो की…”
rohit pawar and udayanraje bhosale
साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार? रोहित पवारांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “उदयनराजे…”
rashmi kolte bagal joins bjp marathi news, digvijay bagal joined bjp marathi news
करमाळ्याच्या बागल गटाचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण! भाजपमध्ये स्थिरावरणार का ?

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘उलथापालथ’ पाहून सोशल मीडियावर बराच धुमाकूळ सुरू आहे, त्यातील दोन संदेश बरेच बोलके आहेत. पहिला म्हणजे ‘‘गेले काही दिवस पाहतोय, ज्या वेगाने राष्ट्रवादीतील मंडळी भाजपमध्ये दाखल होत आहेत. असेच सुरू राहिल्यास काही दिवसानंतर नरेंद्र मोदी यांच्या जागी शरद पवार यांचा फोटो झळकलेला दिसेल.’ आणि दुसरा म्हणजे, ‘राष्ट्रवादीच्या लोकांची मुख्यमंत्र्यांसोबत वाढलेली गर्दी पाहून असं वाटतंय, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राष्ट्रवादीत आले आहेत.’ यातील विनोदाचा आणि अतिशयोक्तीचा भाग सोडल्यास परिस्थिती त्या दिशेने वाटचाल करते आहे, हे अमान्य करताच येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतून भाजपकडे जोरदार ‘इनकिमग’ सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले. त्यापाठोपाठ, भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचे समर्थक असलेल्या आजी-माजी नगरसेवकांची रांग लागली. ‘तळ्यात-मळ्यात’ करणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवकांसह नऊ नगरसेवक व बरेच कार्यकर्ते त्यांच्यापाठोपाठ भाजपमध्ये आले. आता आझम पानसरे व त्यांचे समर्थकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यापुढील टप्यात लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपची ‘राष्टवादी’ होत आहे, अशीच ही परिस्थिती आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये वर्षांनुवर्षे भाजपची अवस्था दयनीय अशीच होती. स्थानिक मंडळींचा काँग्रेसकडे व नंतर राष्ट्रवादीकडे ओढा राहिला. मूठभर शिस्तीचे व निष्ठावान कार्यकर्ते शहर भाजपचा गाडा ओढत होते. त्या कार्यकर्त्यांवर अनेकांचा रोष होता. मात्र, ते कार्यरत राहिले. भाजपचा झेंडा लावल्यास घरांवर दगड पडलेले आणि त्या पक्षाचे काम केल्यास दमदाटी झाल्याचे अनेक दाखले दिले जातात. काही वर्षांपूर्वी, अंकुश लांडगे यांच्यारूपाने भाजपला स्थानिक चेहरा मिळाला. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांनी त्यांच्यातील वाद विसरून लांडगे यांच्या पाठीशी ताकद उभी केली. त्या काळात भाजपची चांगल्याप्रकारे वाढ होऊ लागली. स्वप्नवत वाटतील असे १५ नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून आले. अशातच, लांडगे यांचा खून झाल्याने भाजपला वाली राहिला नाही. ज्यांचा वकुब नाही, अशा मंडळींकडे पक्षाची सूत्रे गेल्याने घसरण सुरू झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे आणि मुंडे-गडकरी वादामुळे पक्षाची वाढ खुंटली. चांगले कार्यकर्ते पक्षात येत नव्हते. एखाद्याला भाजपचे तिकीट देतो म्हटले, तरी ते घ्यायला कोणी पुढे येत नव्हते, अशी परिस्थिती होती. नरेंद्र मोदी नावाचे राजकीय वादळ भारतीय राजकारणात आले. ‘मोदी लाटे’ ने भाजपला शत:प्रतिशत बदलून टाकले. लोकसभेत भाजपने स्वबळावर निर्विवाद सत्ता स्थापन केल्यानंतर राज्याराज्यात भाजप प्रवेशासाठी रांगा लागल्या, तेच चिंत्र पिंपरी-चिंचवडने अनुभवले. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या लक्ष्मण जगताप यांनी बदलते राजकीय वारे लक्षात घेऊन भाजपचे कमळ स्वीकारले. त्यांचा निर्णय अचूक होता, हे त्यांना चिंचवड विधानसभेत मिळालेल्या मताधिक्यातून सिद्ध झाले. जगताप भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. भोसरीत भाजपचे उमेदवार एकनाथ पवार आणि िपपरीत भाजप आघाडीकडून लढलेल्या चंद्रकांता सोनकांबळे यांना धो-धो मते मिळाली. त्याचा परिणाम असा झाला, की भाजपच्या ‘दर्शनबारीत’ भाविकांची संख्या वाढली. पवारांच्या मुशीत तयार झालेल्या जगतापांकडे नेतृत्वाची धुरा सोपवून भाजपने ‘लक्ष्य २०१७’ चे सेनापतिपद त्यांच्याकडे दिले. अमर साबळे यांना खासदारकी दिली. अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांना ‘लाल दिवा’ असलेले लोकलेखा समितीचे अध्यक्षपद दिले. महेश लांडगे यांना ‘क्रीडा प्राधिकरण’ देण्याचे सूतोवाच करण्यात आले. आता पानसरे यांनाही सत्तेत वाटेकरी करून घेण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेली िपपरी पालिकेची सत्ता खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. स्थानिक नेत्यांनी हवी तशी ताकद मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आतापर्यंत स्थानिक नेत्यांच्या ताकजीवर राष्ट्रवादीच्या सत्तेचे गणित जमून येत होते. तीच ताकद भाजपकडे वळू लागली आहे. विलास लांडे वगळता राष्ट्रवादीकडे शहरभर वापरता येईल, असा चेहरा राहिला नाही. लांडे देखील भाजपमध्ये येण्यास उत्सुक होतेच. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना खोडा बसला. भाजपची ताकद वाढू लागली, तशीच गर्दीही वाढू लागली आहे, त्यातून अनेक प्रश्न उभे राहणार आहेत. नव्या-जुन्यांचा संघर्ष वाढण्याचा सर्वाधिक धोका आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेली मंडळी मूळ भाजपच्या लोकांना किती किंमत देणार आणि जुने भाजपवाले राष्ट्रवादीतून आलेल्यांना कितपत सामावून घेणार, हा तसा अडचणीचा मुद्दा आहे. भाजपची शिस्त, ध्येय-धोरणे, विचारसरणी, संघ परिवार नव्या मंडळींना माहिती नाही. त्यांना तिकीट मिळण्याशी व निवडून येण्याशी मतलब आहे, बाकी गोष्टींशी त्यांना घेणं-देणं नाही. असे ‘हवशे’, ‘नवशे’ पक्षात वाढले आहेत. त्यामुळे जे राष्ट्रवादीत चालत होते, तेच भाजपमध्ये सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराच्या मुद्दय़ावर भाजप निवडणूक लढवणार आहे. गेल्या दोन वर्षांत जे राष्ट्रवादीतून किंवा अन्य पक्षातून भाजपमध्ये आले आहेत आणि भाजपचे उमेदवार म्हणून पुन्हा लोकांसमोर जाणार आहेत, त्यांचे पूर्वकर्तृत्व तपासून पाहिल्यास भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपला प्रचारातून सोडून द्यावा लागेल.

[jwplayer VZmKdu9N]