आरक्षणाबाबत केलेल्या विधानाबद्दल महापौर मुक्ता टिळक यांनी माफी मागावी, या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी महापौरांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.

आरक्षणामुळेच ब्राह्मणांना परदेशात जावे लागले असे विधान नाशिक येथील कार्यक्रमात महापौरांनी शुक्रवारी केले होते. या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. भारतीय जनता पार्टीची आरक्षणाबाबत कायम दुटप्पी भूमिका राहिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मा. गो. वैद्य यांनी वेळोवेळी आरक्षणविरोधी भूमिका मांडली आहे. त्यांच्या पंक्तीत महापौर मुक्ता टिळक यांचा समावेश झाला आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली. महिला आरक्षणाचा लाभ मिळवून टिळक महापौरपदी निवडून गेल्या आहेत. तुम्हीच आरक्षणविरोधी असाल तर महापौरपदाचा त्याग करणार का? तसेच स्वत:ला आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेणारा आरपीआय (आठवले गट) भाजपबरोबर सत्तेत सहभागी असून त्यांना महापौरांचे विधान मान्य आहे का? असा सवालही राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे. शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, पक्षाचे महापालिकेतील गटनेता चेतन तुपे, रवींद्र माळवदकर, सुभाष जगताप, प्रिया गदादे, श्वेता होनराव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर मनुवादाच्या विरोधात लढले. देशातील दलितांना न्याय देण्यासाठी त्यांनी आरक्षणाची घटनात्मक तरतूद केली. एकीकडे आंबेडकरांना प्रात:स्मरणीय म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांची अवहेलना करायची, हा दुटप्पीपणा फक्त भाजपचे नेतेच करु शकतात. या प्रकरणी भाजपने महापौरांचा राजीनामा घ्यावा आणि महापौरांनी विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

काँग्रेसतर्फे आज आंदोलन

महापौरांनी केलेल्या विधानाचा शहर काँग्रेसनेही निषेध केला असून पक्षातर्फे रविवारी (३० मे) सकाळी साडेदहा वाजता अप्पा बळवंत चौकात निदर्शने केली जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

मुक्ता टिळक यांच्या व्याख्यानात आरक्षणाचा उल्लेख नसल्याचा आयोजकांचा दावा

नाशिक : पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी आरक्षणाबाबत नाशिकमध्ये केलेल्या विधानामुळे वाद उफाळला असला तरी त्याबाबत खुद्द आयोजकांनी कानावर हात ठेवले असून, असे कोणतेही वक्तव्य त्यांनी केले नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे टिळक यांच्या विधानाचा सामाजिक समता अभियानाने निषेध केला आहे. येथील चित्पावन ब्राह्मण संघाच्यावतीने आयोजित परशुराम वेद पुरस्कार वितरण सोहळा पुण्याच्या महापौर टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी कथितरीत्या ‘आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते,’ असे नमूद करत शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसाय-उद्योगासाठी देशात पूरक वातावरण असणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधले होते. टिळक यांच्या या विधानाचे स्थानिक पातळीवर पडसाद उमटले. मात्र या सोहळ्याचे संयोजक विजय साने यांनी टिळक यांनी असे कोणतेही विधान केले नसून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा केला. वास्तविक त्यांनी नोकरीच्या संधी कमी झाल्या असल्या तरी ब्राह्मण समाजातील तरुणांनी नवीन वाटा शोधाव्यात, असे सूचित केले. समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती त्यांनी केली नाही. किंबहुना टिळक यांनी आरक्षण या विषयाला स्पर्शच केला नसल्याचे साने यांनी सांगितले. दरम्यान, सामाजिक समता अभियानचे सरचिटणीस संदीप डोळस यांनी टिळक यांच्या विधानाचा निषेध केला. हे वक्तव्य जातीय उतरंडीतून आले आहे. आरक्षण कोणत्याही समाजाच्या प्रगतीच्या आड आरक्षण येणार नाही. जो समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनाकारांनी आरक्षण आणले. भारतीय जाती व्यवस्था नष्ट होत नाही, तोवर आरक्षण राहील. टिळक यांनी आरक्षणावर बोलण्याऐवजी जातीय व्यवस्था कशी नष्ट होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे डोळस यांनी सांगितले.