कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ, नियोजनाचा अभाव व गटबाजीमुळे विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या मेळाव्याचा फज्जा उडाला. अजितदादांनी पाठवलेल्या निरीक्षकांसमोरच शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यावर आमदार विलास लांडे व नगरसेवकांनी हल्लाबोल केला. प्रत्युत्तरात बहलांनी, माझ्यापेक्षा चांगला अध्यक्ष निवडा, पद सोडण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. अनधिकृत बांधकामे, शास्तीकरासह विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांना ७०० पत्रे देऊनही शासनदरबारी त्याची दखल न घेतल्याने ‘अवघड परिस्थिती’ झाल्याचे सांगत हे प्रश्न न सुटल्यास तुमचे तिकीट नको, असा निर्धार लांडेंनी व्यक्त केला.
चिंचवडच्या दर्शन हॉल सभागृहातील मेळाव्यास प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी, निरीक्षक कृष्णकांत कुदळे, स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे आदी उपस्थित होते. अत्यल्प प्रतिसाद, खंडित वीजपुरवठा व निरूत्साही वातावारणामुळे दहाचा मेळावा साडेअकराला सुरू झाला. त्यात अनेकांच्या भाषणात लोकसभा निवडणुकीचे पडसाद जाणवले. विलास लांडे, आर. एस. कुमार, शमीम पठाण, राजेंद्र जगताप आदींनी बहल यांच्या कार्यपध्दतीला उद्देशून टीकास्त्र सोडले. तर,पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणीही झाली.
लांडे म्हणाले,की महापालिकेचा कारभार पाहणाऱ्यांनी पक्षसंघटनाही मोडळकीस आणली. अजितदादांच्या पुढे-पुढे करणारे नगरसेवकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या हातात कारभार दिला, काय उजेड पाडला?  ठराविक जण सगळे ‘उद्योग’ करतात. नगरसेवकांना फक्त हात वर करण्याचे काम आहे. टीडीआर, ठेकेदार, बिल्डर, वायसीएम, पालिकेची टक्केवारी यातच सगळे गुंग आहेत. पक्षात मात्र मरगळ आहे. अजितदादांनी शहराचा विकास केला. पैसे खाणारे शिवसेनेचे नेतेच मोठे झाले. त्यांना आमच्याच मंडळींनी रसद पुरवली. बांधकामे, शास्तीकराचा विषय मार्गी न लागल्यास भोसरीत कोणालाही उमेदवारी द्या, त्याचे काम करू. राजेंद्र जगताप म्हणाले, शहराध्यक्षांच्या प्रभागातच शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले, हेच खरे गद्दार आहेत. अजितदादांच्या नावाखाली दुकानदारी चालते, पदाधिकारी गोलमाल करतात. कुमार म्हणाले, पालिकेत ३२ कोटींचे टेंडर ७२ कोटींला गेले. दोन कोटींचे काम १२ कोटींवर व एक कोटीचे मशीन अडीच कोटीला गेले. असे ‘उद्योग’ करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. लोक कारणे विचारतात. सत्ता असूनही कामे न केल्याने मतदारांनी धडा शिकवला. कधीतरी बोलण्याची संधी दिल्याची टिप्पणी करत शमीम पठाण यांनी पालिका नेत्यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले.
 
.‘साहेबांना’ होते अवघे पाच हजाराचे मताधिक्य – बहल
योगेश बहल यांनी आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढले. शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाल्याचे कारण सांगताना, शरद पवारांनाही अवघे पाच हजाराचे मताधिक्य मिळाले होते, तसेच आझम पानसरेंचा पराभव झाला होता, याचे दाखले त्यांनी दिले. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, पूररेषा, रेडझोन, साडेबारा टक्के अशा प्रश्नांवर वर्षांनुवर्षे निर्णय होत नसल्याने तीनही आमदार वैतागले आहेत, तोच राग आमच्यावरही काढला जातो. मावळ लोकसभेत ८० टक्के पक्षाच्या विरोधात होते, तीच मंडळी मोठी भाषणे ठोकतात, याचे आश्चर्य वाटते. अशांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे होते. पक्षाचे काम करणारेच वाईट ठरले. मी शहराध्यक्ष नसतो तर पक्ष कार्यालयाला कुलूप लावावे लागले असते. महापौरपदावर किती चांगले काम केले, त्याचे कौतुक होण्याऐवजी स्वपक्षीयांच्या पोटात गोळा येतो, अशी भावना बहलांनी व्यक्त केली.