माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधकांकडून केल्या जाणाऱया टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना ‘सोमेश्वर’च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठीच्या निवडणुकीत २१ पैकी १० जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित ११ ठिकाणीही याच पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल एकहाती सत्ता मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पॅनेलच्या विरोधात असलेल्या काकडे पॅनेलचे प्रमुख सतीश काकडे यांनाच या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत साखर उद्योगातील ज्येष्ठ तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी बचाव सहकारी पॅनेलने एकूण एकवीस जागांपकी पंधरा जागेवर घवघवीत यश मिळवून अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली होती. त्यामुळे सोमेश्वरच्या निकालाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा गेल्या निवडणुकीपेक्षा मतदान वाढल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण होते. त्याचवेळी राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सर्व काकडे कुटुंब एकत्र आल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती. काकडे पॅनेलमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. अजित पवार यांनीसुद्धा १० ते १२ दिवस कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मुक्काम करून जाहीर सभा घेतल्या. कोणत्याही स्थितीत कारखान्याचे खासगीकरण करणार नाही, असे आश्वासन त्यांनी सभासद मतदारांना दिले होते.