भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर; पाळीव श्वानांबाबतही प्रचंड तक्रारी

कुत्रा अंगावर धावल्याने झालेल्या वादावादीतून एकाचा खून झाल्याची घटना हडपसरमध्ये गुरुवारी घडली आणि सात ते आठ जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. कुत्र्यावरून झालेल्या भांडणातून खून हे अगदीच टोकाचे असले तरी सदनिकांमध्ये, विशेषत: सोसायटय़ांमध्ये कुत्रा पाळणाऱ्यांबद्दलची इतर रहिवाशांची नाराजी आणि त्यातून होणारी भांडणे हे प्रकार शहरात नित्याचे झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचाही सामान्यांना होणारा त्रास मोठा असून पालिकेच्या आकडेवारीनुसार दर महिन्याला १६०० हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या चाव्याचा ‘प्रसाद’ मिळत आहे.

पाळीव कुत्र्यांच्या मालकांबाबत इतर रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याचे चित्र अनेक सोसायटय़ा आणि रहिवासी कॉलन्यांमध्ये आहे. कुत्री दिवसरात्र भुंकतात, रात्रीच्या वेळी रडतात, कुत्र्यांचे मालक कुत्र्यांना प्रातर्विधींसाठी गल्लीत फिरायला नेतात परंतु कुत्र्याने करून ठेवलेली घाण साफ करत नाहीत, अशा प्रकारच्या नाराजीवरून श्वानप्रेमी आणि सदनिकांमधील रहिवाशांची वारंवार भांडणे होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक सोसायटय़ा आणि बंगल्यांमधील वाद तर थेट पोलिस चौक्यांपर्यंत पोहोचले आहेत. महापालिकेची उद्याने आणि जॉगिंग ट्रॅक्सवरही श्वानप्रेमी आपली कुत्री घेऊन जात असल्यामुळे बागांमध्येही भांडणाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

दुसरीकडे, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुणेकरांच्या पाचवीला पुजल्यासारखी अवस्था आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल १०,०७७ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांमुळे रेबिजविरोधी लस घेण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान ५,७२६ नागरिकांना कुत्र्यांच्या चाव्यांचा त्रास सहन करावा लागला होता. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि टपरीवजा खाऊगल्ल्यांच्या परिसरात ही कुत्री मोठय़ा संख्येने असून रस्त्यावर वा कचऱ्यात फेकलेल्या अन्नावर ती जगतात. भूतदयेपोटी भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.  शहराच्या अनेक भागांत पहाटेच्या वेळी, संध्याकाळी व विशेषत: रात्री भटकी कुत्री कळपांनी फिरताना दिसत असून त्या भागातून जाणाऱ्यांच्या अंगावर कुत्री धावून जाणे, गाडय़ांवर चाल करून जाणे, गाडय़ांच्या मागे पळणे अशा गोष्टींमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सदनिकांमध्ये कुत्रा पाळताना त्याच्या दिनक्रमाच्या बाबतीतील गोष्टींकडे अनेकदा त्यांच्या मालकांकडून नकळत दुर्लक्ष होत असून त्याचे पर्यवसान इतरांच्या कुत्र्याबद्दलच्या नाराजीत होत असल्याचे निरीक्षण ‘डॉग बिहेव्हिअरल कन्सल्टंट’ नोंदवत आहेत. ‘कुत्ता कन्सल्टंट’या फर्मचे विक्रम होशिंग म्हणाले, ‘‘कुत्र्याबद्दलच्या रहिवाशांच्या तक्रारी प्रामुख्याने त्याचे भुंकणे, रडणे किंवा शी-शू करण्याबाबतच्या असतात. अशा वेळी कुत्र्याच्या भुंकण्याचे कारण शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक ठरते. साधारणत: भूक लागणे, कुत्र्याला बांधून ठेवलेले असणे किंवा त्याचा पुरेसा व्यायाम न होणे यामुळे कुत्री भुंकत राहतात. पुरेसा व्यायाम न झाल्यास कुत्री अस्वस्थ होतात.’’
dog-chart