पुण्यात अगदी लहान स्वरूपात सुरू झालेल्या ‘नेटसर्फ’ या कंपनीने थेट विक्रीच्या क्षेत्रात जम बसवला आणि त्यांची उत्पादने महाराष्ट्र व गुजरातसह देशभर विकली जाऊ लागली. ही कंपनी आता अमेरिकेतही थेट विक्री क्षेत्रात उतरण्याच्या प्रयत्नात आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

पुण्यातील ‘नेटसर्फ कम्युनिकेशन’ या कंपनीचे नाव अनेकांना माहीत नसेल. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठीची उत्पादने, तसेच आरोग्य व सौंदर्यवर्धनासाठीची उत्पादने ही कंपनी बनवते आणि थेट विक्रीच्या (डायरेक्ट सेलिंग) माध्यमातून ती विकते. केवळ पुण्यात किंवा महाराष्ट्रातच नव्हे, तर बावीस राज्यांमध्ये त्यांची उत्पादने विकली जात असून देशात एक लाख व्यक्ती त्यांचे विपणन करतात.

‘नेटसर्फ’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुजित जैन यांचे वडील वकिलीच्या व्यवसायात, तर एकत्र कुटुंबात सुजित यांच्या काकांचा दागिने आणि घरबांधणीचा व्यवसाय होता. सुजित यांनी प्रथम वकिली आणि नंतर १९९८ मध्ये व्यवस्थापन शाखेत शिक्षण घेतले. त्यांना पहिल्यापासूनच काहीतरी वेगळा व्यवसाय करण्याची इच्छा होती, पण घरच्या व्यवसायातही ते मदत करत होते. पुण्यातील ‘नाइस कॉम्प्युटर एज्युकेशन’ या कंपनीचे ते भागीदार झाले. त्या वेळी संगणकाचे ज्ञान सर्वाना नसे, तसेच इंटरनेट आजच्या इतके वापरले जात नव्हते. परंतु इंटरनेटमध्येच भविष्य आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी एका स्नेह्य़ांबरोबर राज्यात ‘ई-कॉमर्स’ व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात या स्नेह्य़ांची कंपनी विकली गेली आणि ती योजना पुढेच जाऊ शकली नाही. नंतर सुजित यांनी २००० मध्ये ‘ई-कॉमर्स’ कंपनी म्हणून ‘नेटसर्फ’ची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी पुण्याचे एक ‘पोर्टल’ सुरू केले. परंतु तेव्हा या व्यवसायात ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’ हा मोठाच प्रश्न होता, शिवाय ‘ऑनलाइन’ खरेदी करणारी मंडळी कमी होती. त्यामुळे हा व्यवसाय चालला नाही. त्याच वेळी सुजित हे संकेतस्थळे बनवून देण्याचाही व्यवसाय करत होते. त्याअंतर्गत त्यांनी संकेतस्थळ बनवण्याचे एक सॉफ्टवेअर तयार केले. ते वापरून संगणक वापरता येणारी कुणीही व्यक्ती स्वत:चे संकेतस्थळ बनवू शकत होती. हे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भांडवलाचा प्रश्न होता. तेव्हा त्यांनी थेट विक्रीचा (डायरेक्ट सेलिंग मॉडेल) विचार केला. त्यात विक्रेत्यास विक्रीवर आधारित पैसे द्यायचे होते. त्यांचे थेट विक्रीचे जाळे विस्तारू लागले खरे, पण त्यांच्याकडे केवळ संकेतस्थळ बनवणारे सॉफ्टवेअर हेच उत्पादन होते. त्यामुळे विक्रीवर मर्यादा येऊ लागल्या. त्या वेळी थेट विक्रीचे ‘मॉडेल’ कायम ठेवून उत्पादनांचा त्यांना नव्याने विचार करावा लागला. आधी त्यांनी माहिती तंत्रज्ञानातील प्रशिक्षणाची पॅकेज आणि इंटरनेट पॅकेज विक्रीस आणली. संगणक प्रशिक्षणासंबंधीचे व्यवसाय फारसे फायद्यात चालत नसल्याचे पाहून त्यांनी इतर उत्पादने आणण्याचे ठरवले. त्या वेळी ‘अजय बायोटेक’ ही कंपनी सेंद्रिय शेतीसाठीची उत्पादने बनवत होती. त्यांना विपणनात समस्या येत होत्या. रासायनिक उत्पादनांचा वापर कमी करण्यासाठी त्याबरोबरच वापरता येणारी सेंद्रिय उत्पादने ‘नेटसर्फ’ने त्यांच्याकडून बनवून घेतली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि ‘नेटसर्फ’ने ती कंपनी विकत घेतली. त्यानंतर जैव उत्पादने बनवणाऱ्या इतर उत्पादकांबरोबर आरोग्य आणि स्वच्छतेसाठीची विविध उत्पादने बाजारात आणली.

‘नेटसर्फ’ सध्या ४९ उत्पादने विकत असून त्यांची उलाढाल १५० कोटींची आहे, तर अजय बायोटेक कंपनीसह समूहाची उलाढाल १९० कोटींची आहे. पुण्यातील सासवडसह परवानू (हिमाचल प्रदेश) आणि सिक्कीम येथे त्यांचे उत्पादन चालते. ऐंशी टक्के उत्पादन ते स्वत: करतात, तर २० टक्के उत्पादने बनवून घेतात. कंपनीचे प्रमुख केंद्र पुण्यात असून मुंबई व अहमदाबादमध्ये त्यांची कार्यालये आहेत. सुजित जैन आणि संजय मालपाणी हा व्यवसाय पाहतात.

‘ ‘डायरेक्ट सेलिंग’ या व्यवसायाच्या ‘मॉडेल’विषयी लोकांच्या मनात शंका असतात. प्रत्येक व्यवसायात एका रात्रीत पैसा कमवून पळ काढणारे व्यावसायिक असतात. देशात या व्यवसायावर योग्य नियमन नसल्यामुळे असे काही व्यावसायिक कार्यरत होते. परंतु आता यात नियमन आले आहेत,’ असे सुजित सांगतात. देशात एक लाख व्यक्ती ‘नेटसर्फ’च्या उत्पादनांचे विपणन करतात. त्यातील २५ हजार लोक महाराष्ट्रात व्यवसाय करतात. महाराष्ट्रात कंपनीचा ४६ टक्के व्यवसाय शेतीविषयक उत्पादनांमधून होतो. ३४ टक्के व्यवसाय आरोग्यविषयक उत्पादनांमधून, तर २० टक्के ‘पर्सनल केअर’ उत्पादनांमधून होतो. बावीस राज्यांमध्ये त्यांचा व्यवसाय चालत असला, तरी महाराष्ट्र आणि गुजरात ही त्यांच्यासाठी मोठी व्यापार केंद्रे ठरली आहेत. कंपनीचा ४५ टक्के व्यवसाय पुनर्विक्रीच्या (री पर्चेसिंग) माध्यमातून होत असून हा व्यवसाय ८० टक्क्य़ांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे, असेही सुजित यांनी सांगितले.

यापुढे ‘पर्सनल केअर’ उत्पादनांमध्ये केसांना लावण्याचा कलप आणायचा आहे. तसेच हळद, गोखरू अशा विविध घटकांचे अर्क (एक्स्ट्रॅक्ट) आणि रसायनमुक्त ‘डिर्टजट’ बनवण्यावर ते काम करत आहेत. त्यांना अमेरिकेत थेट विक्रीच्याच माध्यमातून व्यवसाय विस्तार करायचा आहे.

sampada.sovani@expressindia.com