शिक्षणमंत्र्यांची घोषणा; शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यांचीही ओळख
येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता चौथीचे इतिहासाचे नवे पुस्तक लागू करण्यात येणार असून शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीच्या पलीकडे जाऊन त्यांच्यातील व्यवस्थापन गुरूची ओळख या पुस्तकातून होईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी जाहीर केले.
बालभारतीच्या सुवर्णवर्ष शुभारंभ समारंभात तावडे बोलत होते. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, बालभारतीचे संचालक चंद्रमणी बोरकर, माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग, राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे, प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने आदी उपस्थित होते.
पाठय़पुस्तके काळानुरूप बदलली पाहिजेत असे सांगून तावडे म्हणाले, ‘पाठय़पुस्तके आणि अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत केला पाहिजे. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्यांची, पराक्रमाची ओळख आहे. ती आवश्यकच आहे. मात्र त्याचबरोबर महाराज व्यवस्थापन गुरू होते, कुशल प्रशासक होते त्याचीही ओळख विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. त्यासाठी या वर्षीपासूनच चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकांत बदल करण्यात आला आहे. महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याची ओळख करून देणारी आठ पाने नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकांतही ‘१८५७चे बंड’ असा उल्लेख आहे, हा स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. त्याबाबत सूचना देऊन राष्ट्रीय पाठय़पुस्तक मंडळाने बदल करूनही राज्याच्या पाठय़पुस्तकांत बदल करण्यात आला नव्हता. यापुढे आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकांत ‘१८५७चे स्वातंत्र्य समर’ असा उल्लेख करण्यात येईल.’
बालभारतीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांसाठी तयार केलेले बोधचिन्ह, फॉण्ट्स, ई-लायब्ररी यांचे अनावरण करण्यात आले.
बालभारतीकडून परीक्षण करून घेतलेले ई-लर्निग साहित्य वैधच ठरणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

शालेय शिक्षणाचाही आराखडा
‘उच्चशिक्षणाच्या बृहत् आराखडय़ाप्रमाणे शालेय शिक्षणाचाही आराखडा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाचा विचार करणारी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात येईल,’ अशी घोषणा तावडे यांनी बालभारतीच्या कार्यक्रमांत केली. ‘बालभारती ही बालभारतीच राहील,’ असे सांगून बालभारतीचे विलीनीकरण, तिच्या कामात बदल होणार असल्याच्या चर्चावर त्यांनी पडदा टाकला.

सामाजिक संस्थांनी पळ काढू नये
शाळाबाह्य़ मुलांच्या सर्वेक्षणाबाबत स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतले आहेत. त्याबाबत तावडे यांना विचारले असता. ‘अडचणी दूर करण्यासाठी मदत करण्याऐवजी स्वयंसेवी संस्थांनी पळ काढू नये,’ असा टोला तावडे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. ते म्हणाले, ‘शाळाबाह्य़ मुलांच्या सर्वेक्षणाबाबत स्वयंसेवी संस्थांचे आक्षेप आहेत. ते दूर करण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. सध्या शिक्षण विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे, इतरही अडचणी आहेत. आम्हालाही त्या त्रुटी जाणवतात. मात्र त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’