‘ज्योत से ज्योत जलाते चलो..’ या पंक्ती कोणाच्या? तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे ऐकाल, तर या संत ज्ञानेश्वरांच्या पंक्ती आहेत. इतकेच नव्हे, तर गीते साहेबांनी चक्क ज्ञानेश्वरांची क्षमा मागून ‘ज्योत से ज्योत जलाते चलो.. विकास की गंगा बहाते चलो’ असा नाराही दिला!
निमित्त होते, दी ऑटोमेटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) वतीने भरवण्यात आलेल्या ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०१५’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे. हे प्रदर्शन आणि एआरएआयच्या चाकण येथील दुसरी प्रयोगशाळा यांचे उद्घाटन अनंत गीते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी भाषणात त्यांनी हे वक्तव्य केले. या वेळी अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अंबूज शर्मा, एआरएआयच्या प्रमुख रश्मी उध्र्वरेषे, एआरएआयचे उपाध्यक्ष राजेंद्र वढेरा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी मंत्रिमहोदयांनी हिंदीत भाषण केले. वाहन क्षेत्रात जगात पुढे जायचे असल्यास काय करावे लागेल, याचे स्पष्टीकरण ते आपल्या भाषणात देत होते. त्या वेळी त्यांनी ‘ज्योतसे ज्योत..’ या पंक्तीचा दाखला दिला. या पंक्तीमध्ये बदल करून ‘प्यार की गंगा’ऐवजी ‘विकास की गंगा’ अशा पंक्ती त्यांनी वापरल्या आणि मूळ पंक्तीत हा बदल केल्याबद्दल ज्ञानेश्वरांची क्षमा मागत असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांचा गोंधळ उडाला आणि माउलींनी हिंदीमध्ये असे काही लिहून ठेवले आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
गीते हे यापूर्वीही आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. या आधी त्यांनी दुष्काळी भागाच्या दौऱ्यात, शेतात पाय न ठेवताच पाहणी केली होती. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी, ‘केंद्रीय मंत्री तुमच्या शेतापर्यंत येतो तेच काय कमी आहे का?’ असे उत्तर दिले होते. त्यानंतर आता पुण्यातील कार्यक्रमात गीतेसाहेबांनी आपल्या वक्तव्याने पुण्यात ‘ज्योतसे ज्योत’ पेटवली.