’  १७ हजार ३०० रुपयांची वाढ ’  वर्षांत १८ वेळा ब्लॉक क्लोजर ’  उद्योगनगरीने नि:श्वास सोडला

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर टाटा मोटर्स कंपनीतील वेतनवाढ करारावर व्यवस्थापन व कामगार संघटना अशा दोहोंकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार, कामगारांना १७ हजार ३०० रुपये वाढ मिळणार आहे. गेल्या १९ महिन्यांपासून रखडलेला करार मार्गी लागल्याने जवळपास सहा हजार कामगारांनी कंपनीत जल्लोष केला. उद्योगनगरीचा कणा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या टाटा मोटर्समध्ये बराच काळ सुरू असलेल्या संघर्षांवर समाधानकारक तोडगा निघाल्याने अवघ्या औद्योगिक क्षेत्राने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा व टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पिंपरी दौऱ्यानंतर वेगवान घडामोडी झाल्या व त्याची फलनिष्पत्ती म्हणूनच हा करार होऊ शकला. व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे कार्यकारी संचालक सतीश बोरवणकर, प्रकल्पप्रमुख संगमनाथ दिग्गे, संजय शर्मा यांनी, तर कामगारांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष समीर धुमाळ, संजय काळे, सुरेश जासूद आदी पदाधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर कामगारांनी कंपनीतच भंडारा उधळून आनंदोत्सव साजरा केला. एक सप्टेंबर २०१५ पासून तीन वर्षांचा वेतन करार राहणार आहे. कामगारांना सरासरी १७ हजार ३०० रुपये वाढ मिळणार आहे. त्यादृष्टीने तीन टप्पे निर्धारित करण्यात आले असून, पहिल्या वर्षी ७२ टक्के, दुसऱ्या वर्षी १५ टक्के आणि तिसऱ्या वर्षी १३ टक्के वाढ मिळणार आहे. कंपनीच्या वतीने यापुढे वर्षांकाठी १८ ब्लॉक क्लोजर होणार असल्याचे करारात नमूद करण्यात आले आहे.

वेतनवाढ करार व अन्य मागण्यांवरून कंपनीत १९ महिन्यांपासून संघर्ष सुरू होता. १६ मार्चपासून कामगारांनी आंदोलन सुरू केले. २० मार्चला रतन टाटा व एन. चंद्रशेखरन कंपनीत आले असता, त्यांनी कामगार प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. त्यानंतर वेगवान हालचाली झाल्या. रविवारी सुट्टीच्या दिवशी बोरवणकर यांनी बैठक बोलावली. प्रदीर्घ चर्चेत व्यवस्थापन व संघटना अशा दोघांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने सर्व मुद्दय़ांवर एकमत झाले. गुढीपाडव्याला करार करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, मंगळवारी (२८ मार्च) गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सात वाजताच कामगार संघटनेची बैठक झाली, कराराचे वाचन झाले. त्यानंतर, जेआरडी टाटा यांच्या पुतळय़ाजवळ कामगारांची सभा झाली. आठ वाजता करारावर सहय़ा झाल्या. त्यानंतर कामगारांनी प्रचंड जल्लोष सुरू केला.