जुलैमधील परीक्षेसाठी ‘झटपट तयारी’ वर्गाची जाहिरातबाजी

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदवी प्रवेशही केंद्रीय स्तरावर याच वर्षांपासून लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे खासगी शिकवण्यांना सुगीचे दिवस आले आहेत. देशभर शाखा असलेल्या काही शिकवण्यांनी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ लागू करण्याचा निकाल दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच जुलैमधील परीक्षेसाठी ‘झटपट तयारी’ वर्गाची जाहिरातबाजीही सुरू केली.

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश हे या वर्षी राज्य सामाईक परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’च्याच माध्यमातून वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्याचे आदेश दिले. नव्याने ‘नीट’ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २४ जुलैला नीट घेण्याचे नियोजनही जाहीर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशामुळे प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या खासगी शिकवण्यांची चंगळ झाली आहे. देशभर विस्तार असलेल्या काही शिकवण्यांनी जुलैमध्ये होणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासवर्ग सुरू केले आहेत. राज्यात नीट लागू होणार का, याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. राज्याने केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निर्णय होणे बाकी आहे. असे असतानाही जुलैमधील ‘नीट’ होणार असल्याचे गृहीत धरून अवघ्या दोन महिन्यांत सर्व अभ्यासक्रमाची तयारी करून घेण्याची जाहिरातबाजीही अशा संस्थांकडून करण्यात येत आहे.काही संस्थांकडून पालक आणि विद्यार्थ्यांना फोन करून या अभ्यास वर्गाची माहिती देण्यात येत आहे. ‘नीट लागू झाली आणि नंतर शिकवणी वर्गाला प्रवेश मिळू शकला नाही तर..’ अशी भीतीही घातली जात आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यास काही टक्के सवलत अशा काही योजनाही या शिकवण्यांनी सुरू केल्या आहेत. साधारण २० हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत असे अभ्यासवर्ग, चाचणीवर्गाचे शुल्क आहे.

बाहेरगावाहून शिकवण्यांसाठी चौकशी

केंद्रीय पातळीवरील परीक्षांसाठी स्थानिक शिकवण्यांची संख्या कमी आहे. देशपातळीवरील संस्था या परीक्षांच्या शिकवण्या घेण्यात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्या शाखा या शहरी भागांत अधिक आहेत. त्यामुळे निमशहरी, ग्रामीण भागांतील विद्यार्थी आता शहरी भागांतील अभ्यासवर्गाकडे ‘नीट’च्या मार्गदर्शनाबाबत चौकशी करत आहेत.