दुबईहून सोन्याची तस्करी

दुबईहून लोहगांव विमानतळावर उतरलेल्या स्पाईसजेट कंपनीच्या विमानाच्या प्रसाधनगृहात दोन कोटी आठ लाख रुपयांचे सोने सापडले. सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने विमानाची पाहणी केली तेव्हा स्वच्छतागृहात दडवून ठेवण्यात आलेल्या पिशवीत नऊ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे सापडली.

याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने कस्टम अ‍ॅक्ट १९६२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. स्वच्छतागृहात सोने ठेवणाऱ्या प्रवाशाचा शोध लागला नाही, अशी माहिती सीमाशुल्क विभागाचे उपायुक्त के.शुभेंद्रु यांनी दिली. स्पाईस जेट कंपनीच्या या विमानातून तस्कर सोने घेऊन येणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास विमान लोहगाव विमानतळावर उतरले तेव्हा सीमाशुल्क विभागाच्या पथकाने तेथे पाळत ठेवली होती. प्रसाधनगृहात एका पिशवीत नऊ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे दडवली होती.

विमानतळावरुन बाहेर सोने नेताना पकडले जाण्याची शक्यता होती, त्यामुळे सोने तस्करी करणाऱ्या प्रवाशाने पिशवी तेथेच ठेवल्याची शक्यता आहे,असे शुभेंद्रु यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांत तस्करी करुन आणलेले सोने पकडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीमाशुल्क विभागाने लोहगांव विमानतळावर ड्रोन कॅमेरे घेऊन आलेल्या एका प्रवाशाला पकडले होते. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याने सीमाशुल्क विभागाच्या पथकाने दुबई तसेच आखाती देशातून येणाऱ्या विमान प्रवाशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.