कारखान्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सुखसागरनगर भागातील भांडय़ाच्या कारखान्यात अ‍ॅसिड अंगावर पडून चार महिलांसह नऊ कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी कारखान्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमार कवी (वय १९), कुमार शिवप्रसाद (वय २१), मीना शरद सोनी (वय ४०), सुनीता अनिल नागरे (वय ३५), सुमन शंकर मोहिते (वय ५७), अजय शिवाजी कांबळे (वय १९), अनिल रामधवन गौतम (वय ३९), बायडाबाई एकनाथ खडसे (वय  ५०, सर्व रा. सुखसागरनगर, कात्रज), मथुरा श्रीराम राठोड (वय ४०, रा. बिबवेवाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी कवी, शिवप्रसाद, सोनी यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरे, मोहिते, कांबळे, गौतम, खडसे, राठोड यांना किरकोळ स्वरूपाची इजा झाल्याने उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी शुभम मेटल्स या भांडय़ाच्या कारखान्याचे मालक सुनील रघुनाथ बारोट (रा. लालबाग सोसायटी, सुखसागरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनिल गौतम यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारोट यांचा सुखसागरनगर भागात कारखाना आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कारखान्यात अ‍ॅसिड घेऊन आलेल्या टेम्पोतून माल उतरविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी प्लास्टिकचा कॅन खाली पडल्याने फुटला. अ‍ॅसिड कामगारांच्या अंगावर उडल्याने नऊजण जखमी झाले. कारखान्याचे मालक बारोट यांनी कामगारांच्या सुरक्षेविषयी काळजी न घेतल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने तपास करत आहेत.