पोहणे, सायकलिंग आणि मॅरॅथॉन या तिन्ही खेळांचा समावेश असलेली ‘आयर्नमॅन ऑस्ट्रिया’ ही स्पर्धा वयाच्या २१व्या वर्षी केवळ १३ तासात पूर्ण करण्याची किमया केली आहे पुण्याच्या निशित बिनिवाले या युवकाने. यामुळे निशित ही स्पर्धा पूर्ण करणारा भारतातील सर्वात लहान खेळाडू ठरला आहे.
ऑस्ट्रिया येथे ३० जूनला ही स्पर्धा झाली. ‘आयर्नमॅन ऑस्ट्रिया’ ही स्पर्धा ट्रायथलॉनसारखी जरी असली तरी ही स्पर्धा चारपट मोठी आहे. यामध्ये ३.८ किलोमीटर पोहणे, त्यानंतर १८० किलोमीटर सायकलिंग आणि सर्वात शेवटी ४२.२ किलोमीटर धावावे लागते. हे सर्व टप्पे निशितने १३ तास १८ मिनिटे आणि २५ सेकंदांत पूर्ण केले आहेत.
निशित भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षांला आहे. या स्पर्धेसाठी त्याने अभ्यास सांभाळून सलग सात महिने आठवडय़ाला ४२ ते ४५ तास सराव केला आहे. सायकलिंगच्या सरावासाठी तो पुण्याहून लवासा, सातारा या ठिकाणी जात होता. तसेच कॉलेजला सायकलवरून किंवा पळत जायचा. आनंद टकले, आदित्य केळकर आणि त्याचे पालक डॉ. अतुल आणि डॉ. अवंती बिनिवाले यांनी स्पर्धेसाठी भरपूर प्रोत्साहन दिल्याचे निशितने सांगितले. निशित आता जर्मनीमध्ये होण्याऱ्या ‘रॉथ चॅलेंज’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला इच्छुक आहे.