व्याख्याते नितिन बानगुडे यांचा फेसबुक,व्हॉट्सअपवर टीका करणाऱ्यांना टोला

आजची तरुणाई स्वत:वर कोणतीच जबाबदारी घेण्यास उत्सुक नसते. ‘व्हॉट्स अ‍ॅप’, ‘फेसबुक’वर नैतिकतेच्या गप्पा मारणारे मतदानाला मात्र दांडी मारतात. ज्या दिवशी देशात १०० टक्के मतदान झालेले असेल, तेव्हा चुकीची माणसे निवडून येणार नाहीत आणि समाजाचे चांगले काहीतरी होऊ शकेल, असे मत व्याख्याते नितीन बानगुडे यांनी निगडीत व्यक्त केले.

प्राधिकरणातील जयहिंदू व्याख्यानमालेत ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा युवक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. खासदार अमर साबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष राजेश फलके, नगरसेवक अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक श्याम लांडे, विनायक रणसुभे, माउली थोरात, उपस्थित होते.बानगुडे म्हणाले, प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. महाराज डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे. सध्याच्या व्यवस्थेत तरुण पिढीचे व्यसनांमुळे नुकसान होते आहे.  सध्याच्या पिढीने महाराजांच्या चारित्र्याचे अनुकरण केले पाहिजे. राष्ट्रधर्म हाच खरा धर्म आहे.  वातानुकूलित कक्षात बसून दुष्काळावर गप्पा मारण्यात काय अर्थ आहे, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.