‘उत्कंठा वाढवणारे रहस्यमय, औत्सुक्यपूर्ण लिखाण प्राचीन भारतीय वाङ्मयात मोठय़ा प्रमाणात दिसते. आताच्या काळातही असे लिखाण निर्माण होण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ लेखक राजेंद्र खेर यांनी व्यक्त केले.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे डॉ. सुभाष पवार लिखित ‘निझामाचा पेपरवेट’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्योजक अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. डॉ. पवार यांची तंत्रविषयक अनेक पुस्तके प्रकाशित असून त्यांना राज्य शासनाचे संगणक विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचे ‘रँग्लर परांजपे’ पारितोषिकही मिळाले आहे. ‘निझामाचा पेपरवेट’ ही त्यांची पहिलीच ललित कादंबरी आहे.
‘डॉ. पवारांचे लिखाण त्यांच्या अनुभवसिद्धतेवर आधारित असल्यामुळे त्यांच्यासारख्या समाजातील ज्वलंत प्रश्नांवर समाजप्रबोधनासाठी वृत्तपत्रांतून लिखाण करणे गरजेचे आहे,’ असे मत अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले. या वेळी प्रकाशक अमृता कुलकर्णी याही उपस्थित होत्या.