काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांची टीका
जम्मी-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि पीडीपी यांच्यामध्ये समन्वय नसून पंतप्रधान मोदी यांच्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी शनिवारी केली. कॉंग्रेसचे सरकार असताना इतकी गंभीर परिस्थिती नव्हती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी, प्रियदर्शनी वुमन फोरम आणि पायल तिवारी फाउंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या गौरी गणपती साहित्य जत्रेचे उद्घाटन सिंघवी आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सिंघवी बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे या वेळी उपस्थित होते.
सिंघवी म्हणाले,की महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू असे भाजपने दिलेले आश्वासन हवेत विरले आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.
राज्यातील भाजपने कमी कालावधीमध्ये भ्रष्टाचारात आघाडी घेतली आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांच्यावर आरोप झाले आहेत.
मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरमध्येच राज्यातील सर्वाधिक गुन्हेगारीचे प्रमाण आहे.
राज्य सरकारच्या कारभारात असहिष्णुता, जातीयवाद आणि धर्मवाद असल्याची टीका करुन राणे म्हणाले,की युतीच्या सरकारमध्ये मी पशुसंवर्धनमंत्री होतो. त्या वेळी गोहत्याबंदी कायदा आणला होता. मात्र, आतातो आपल्याला मान्य नाही. त्यावरुन सध्या दलित, अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर शेतमालाच्या बाजारभावासह इतर मुद्दय़ांवर रस्त्यावर उतरुन कॉंग्रेस आंदोलन करेल.
स्वतंत्र विदर्भाला विरोधच असून महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, याबाबत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊ, असे राणे यांनी सांगितले. विदर्भाबाबत कॉंग्रेसची भूमिका ठरली नाही, असे सांगणारे माणिकराव ठाकरे हे अखंड महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती आहेत, अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांना टोला लगावला. वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) मागास राज्यांना जास्त फायदा मिळणार असून प्रगत राज्यांना कमी निधी मिळणार आहे.
महाराष्ट्र प्रगत असल्याने निधी कमी मिळेल. दहीहंडीबाबत बोलताना न्यायालयाशी न भांडता सरकारशी भांडायला हवे होते. तुम्ही लढा मी कपडे सांभाळतो, अशा पद्धतीचे आंदोलन करायचे, असा टोमणा त्यांनी राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून मारला.