पावसाळ्यात खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारी अडचण नित्याचीच! त्यातच सलग पाऊस लागून राहिला की दुरुस्तीलाही वेळ मिळत नाही. या वेळी मात्र पावसाने तब्बल पंधरा दिवसांची उघडीप दिली, तरीही शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. पुण्यातील काही रस्त्यांची पाहणी केल्यावर ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर या रस्त्यांची स्थिती काय असणार, हा मोठा प्रश्न आहे.
पुण्यातील काही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. काही रस्ते खड्डेग्रस्त आहेत, तर काही रस्त्यांचे कामच नीट न झाल्याने किंवा नंतर खणल्याने ते उखडलेले आहेत. प्रातिनिधिक म्हणून व्यस्त रहदारीचा पुणे-सातारा रस्ता आणि लष्कर भागातील काही रस्त्यांची पाहणी केल्यावर रस्त्यांची स्थिती बरी नसल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यांवर खड्डे आहेतच, शिवाय जागोजागी डांबर निघून गेल्यामुळे रस्ते उखडलेले आहेत. कुठे पेव्हर ब्लॉक, कुठे डांबर, कुठे सिमेंटचा रस्ता यामुळे त्यांची अवस्था अधिकच खराब झालेली आढळली. रस्ते समतल पातळीत नसणे, मध्येच डोकावणारी गटारांची झाकणे या समस्या तर जागोजागी आहेत. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त झालेले नाहीत.
पुण्यात गेले १२-१३ दिवस पावसाने उघडीप दिली आहे. पुढचे चार-पाच दिवसही फारशा पावसाची शक्यता नाही. या काळात रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाने तिकडे लक्ष दिलेले नाही. रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. पुणे-सातारा रस्ता, स्वारगेट येथील नवीन उड्डाणपुलाजवळचा रस्ता खराब झाल्याचा दिसतो, तसेच कॅम्पच्या काही भागात देखील रस्त्यांची खराब स्थिती आढळून येते. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
पुण्यातील लष्कर भाग सुनियोजित समजला जातो, मात्र तेथेसुद्धा काही ठिकाणी रस्त्यांची स्थिती खराब आहे. अनेक खड्डे, उखडलेले रस्ते, दुरुस्तीसाठी टाकलेले डांबर जागोजागी वर आलेले असेच चित्र त्या भागातही आहे.

रस्त्यावर पसरलेली खडी धोकादायक
अनेक रस्त्यांवर रस्ते उखडल्यामुळे त्यांची खडी रस्ताभर पसरलेली दिसते. चौकांमध्येही अशीच स्थिती आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघाताचा धोका आहे. ही खडी कित्येक दिवस तशीच पसरलेली पाहायला मिळत आहे.