प्रचारासाठी राहिलेले जेमतेम पंधरा दिवस.. आणि सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे वाढलेला कामाचा पसारा.. आणि शाळा – महाविद्यालयांच्या सुरू असलेल्या परीक्षा यांमुळे नेत्यांच्या सभांसाठी जागा शोधण्यासाठी आता कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे.
उमेदवारांना प्रचारासाठी जेमतेम पंधराच दिवस हातात मिळत आहेत. या पंधरा दिवसांत आपल्या पक्षातील मोठय़ा नेत्यांच्या, स्टार प्रचारकांच्या सभा आयोजित करण्यासाठी आता युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. मात्र, यावेळीही सभा घ्यायच्या तर कुठे घ्यायच्या हा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावत आहे. सभा घेण्यासाठी जागा शोधताना कार्यकर्त्यांची पळापळ  सुरू झाली आहे. त्यातच शाळा, महाविद्यालयांमध्ये सध्या परीक्षा सुरू होत आहेत. दहावी, बारावीच्या ऑक्टोबरच्या परीक्षाही सुरू आहेत. त्यामुळे शिक्षणसंस्थांकडून मैदाने देण्यास नकार देण्यात येत आहे. ‘अजूनपर्यंत आमच्याकडे सभा घेण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज आलेले नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे मैदान उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरणार आहे,’ असे शि. प्र. मंडळींच्या कार्यकारिणीतील सदस्यांनी सांगितले. त्यामुळे स.प. महाविद्यालयाचा पर्याय नसल्यातच जमा आहे.
प्रचारासाठी उरलेल्या तेरा दिवसांमध्ये सणासुदीच्या सुटय़ा वगळून शाळा-महाविद्यालयांच्या मैदानावर सभा घेण्यासाठी फक्त चार दिवस मिळत आहेत. त्यातच या वेळी सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे मिळालेल्या नेमक्या दिवसांमध्ये सभेसाठी हवे ते ठिकाण मिळवण्याचे आव्हान कार्यकर्त्यांसमोर आहे. सभेसाठी जागा शोधताना अडचणी येत असल्याचे पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही सांगितले.
याबाबत ‘सध्या सुरू असलेल्या दांडिया, गरब्याचा त्रास होत नाही आणि शाळा, महाविद्यालयांची वेळ संपल्यानंतर सायंकाळी होणाऱ्या सभांचा त्रास होतो, हे न पटणारे आहे. शिक्षणसंस्थांनी निवडणुकीपुरती दहा दिवस मैदाने उपलब्ध करून द्यावीत,’ असे शिवसेनेच्या प्रवक्तया नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ‘सभेसाठी जागा शोधण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी फक्त शाळांच्या मैदानांव्यतिरिक्त इतरही जागा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात. राज ठाकरे यांच्या सभेसाठी सध्या जागेचा शोध आम्ही घेत आहोत,’ असे मनसेचे बाळा शेडगे यांनी सांगितले. ‘मोठय़ा नेत्यांच्या सभा कुठे घ्यायच्या ही अडचण आहेच. लोकांना त्रास होऊ नये, नेत्यांची सुरक्षा आणि लोकांना सभेला येताही आले पाहिजे अशी जागा शोधावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सध्या आम्ही रेस कोर्सचा विचार करत आहोत.’ असे भाजपचे श्रीपाद ढेकणे यांनी सांगितले. ‘देशपातळीवरील नेत्यांच्या सभांचे वेळापत्रक अजून निश्चित झालेले नाही. त्याबाबत सध्या बोलणी सुरू आहेत. सभांचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर जागेबाबत शोध आम्ही सुरू करू. मात्र, सभांसाठी जागा मिळवणे आव्हानात्मकच आहे, असे कॉंग्रेस कार्यालयातून सांगण्यात आले. ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांच्या सभांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे,’ अंकुश काकडे यांनी सांगितले.
 
स्टार सभा
भाजप – नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, नितीन गडकरी, शहनवाझ हुसेन – वेळापत्रक ठरलेले नाही.
शिवसेना – २ ऑक्टोबर – आदित्य ठाकरे, ९ किंवा १० ऑक्टोबर – उद्धव ठाकरे
मनसे – १० ऑक्टोबर – राज ठाकरे
कॉंग्रेस – पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे – राष्ट्रीय नेत्यांच्या सभा आणि वेळापत्रक ठरलेले नाही
राष्ट्रवादी कँाग्रेस – शरद पवार – सभांचे वेळापत्रक ठरलेले नाही.