नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन

उरणच्या सागरी किनाऱ्यावर अतिरेकी दिसल्याच्या माहितीनंतर देश व राज्याच्या सर्व यंत्रणांनी सर्व शक्यतांचा विचार करून शोधमोहीम व माहितीची पडताळणी केली, मात्र कथिक अतिरेक्यांच्या माहितीबाबत अद्याप पुष्टी मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

उरणमध्ये गुरुवारी सकाळी शाळेत निघालेल्या दहावीतील मुलीने चार जणांना पाहिले. चौघांच्या हातात शस्त्रे व पाठीवर भरलेल्या बॅगा होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर नौदलासह राष्ट्रीय सुरक्षा दल, पोलिसांचे कमांडो दल, दहशतवादी विरोधी पथकासह विविध यंत्रणांकडून गुरुवारपासूनच शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, की सर्वच यंत्रणांनी दोन दिवसांपासून कसून तपास मोहीम राबविली आहे. त्याचप्रमाणे ज्या मुलींकडून ही माहिती मिळाली, त्यांच्याकडूनही अधिक माहिती काढण्यात आली. या माहितीच्या आधारे कथिक अतिरेक्यांची रेखाचित्रेही तयार करण्यात आली आहेत. ही रेखाचित्रे कुणाशी मिळतात का, हेही तपासण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रकारे मोठय़ा प्रमाणावर पडताळणी झाली आहे. एखादी माहिती मिळाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली गेली. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कथित अतिरेक्यांची माहिती आल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी धोका निर्माण होऊ शकणारी महत्त्वाची स्थळे दाखविली. पण, देशहिताच्या दृष्टीने ही बाब योग्य नसल्याने अशा महत्त्वाच्या जागा दाखवू नयेत, असे आवाहनहीमुख्यमंत्र्यांनी केले.