‘अल्टरनेटिव्ह पॅथीं’चे शिक्षण घेऊन मान्यता नसताना नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लावणारे किंवा आपल्या पॅथीव्यतिरिक्त इतरच पॅथीची (विशेषत: अॅलोपॅथीची) प्रॅक्टिस करणारे डॉक्टर पालिकेच्या बोगस डॉक्टर शोध मोहिमेत वारंवार आढळत आहेत. गेल्या दोन महिन्यात शहरातील ३ संशयित बोगस डॉक्टरांवर पालिकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीने गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी दोन डॉक्टर ‘नेचरोपॅथी’चे तर एक ‘इलेक्ट्रोहोमिओपॅथी’चे आहेत.
‘नेचरोपॅथी’ किंवा ‘इलेक्ट्रोहोमिओपॅथी’सारख्या पॅथींचे शिक्षण घेऊन ‘अॅलोपॅथी’चा वैद्यकीय व्यवसाय सुरू करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती पुरवलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यापासून शहरात शनिवार पेठ, धानोरी आणि बोपोडी येथील एकूण ३ जणांवर बोगस वैद्यकीय व्यवसाय करण्याचा आरोप ठेवून पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. यापैकी शनिवार पेठेतील संशयित बोगस डॉक्टर नेचरोपॅथीच्या पदवीधर असून त्या मान्यता नसताना नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लावत होत्या. बोपोडीतील संशयित बोगस डॉक्टर देखील ‘नेचरोपॅथ’ असून त्या ‘अॅलोपॅथी’ची प्रॅक्टिस करत होत्या, तर धानोरीतील संशयित बोगस डॉक्टर हे इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे असून तेही ‘अॅलोपॅथी’चा व्यवसाय करत होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
पालिकेने बोगस वैद्यकीय व्यवसायाबद्दल नोटिसा बजावलेल्या इतर ३ जणांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बंद केल्याचेही पालिकेच्या निदर्शनास आले आहे. यापैकीही एकजण ‘नेचरोपॅथ’ आहे. नेचरोपॅथीबद्दलच्या नियमांबाबत पालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले, ‘‘देशात नेचरोपॅथीचे शिक्षण देणारी १७ मान्यताप्राप्त महाविद्यालये असून यातील एकही महाविद्यालय महाराष्ट्रात नाही. या १७ महाविद्यालयांमधून साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लावण्याची परवानगी आहे, अन्यथा नेचरोपॅथना डॉक्टर ही उपाधी लावता येत नाही. मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये नेचरोपॅथी शिकून डॉक्टर ही उपाधी लावणाऱ्यांनाही केवळ नेचरोपॅथीचीच प्रॅक्टिस करता येते.’’

प्रत्येक झोनमध्ये दर महिन्याला
किमान २ बोगस डॉक्टर शोधणार
पालिकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दर महिन्याला प्रत्येक विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्याला ३० दिवसांच्या कालावधीत किमान २ बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. हे लक्ष्य शहराच्या चारही झोनमध्ये राबवण्यास सांगण्यात आले आहे. सध्या ४ विभागीय वैद्यकीय अधिकारी बोगस डॉक्टरांच्या शोधमोहिमेत काम करत असून १२ अन्न निरीक्षक त्यांना या कामात मदत करत आहेत. आतापर्यंत क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या मोहिमेत सहभागी नव्हते. आता मोहिमेची गती वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय झाला असून १५ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बोगस डॉक्टरांच्या शोधात सहभागी करून घेतले जाणार आहे.